खळबळजनक ! चंद्रपुरात २ महिन्याचं बाळ चोरीला, घटना सीसीटीव्हीत कैद

चंद्रपूर : पोलीसनामा आॅनलाईन  – चंद्रपूर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन महिन्याचं बाळ चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातून हे दोन महिन्याचं बाळ चोरीला गेलं आहे. सदर बाळाला चोरी करुन घेऊन जाणारी महिला सीसीटीव्हीत कैद झाल्याचंही समोर आले आहे. आर्यन साव असं चोरीला गेलेल्या बाळाचं नाव आहे. चंद्रपूर शहरातील हिंगलाज भवानी परिसरात हे कुटुंब वास्तव्यास असल्याचं समजत आहे.
काल दुपारी एक अनोळखी महिला साव यांच्या घरी आली होती. बाेलण्या बोलण्यात तिने बाळाच्या आईचा विश्वास संपादन करत तिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याच्या बहाण्यानं जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन गेली. रुग्णालयात पोहोचल्यानंतर काही कारण सांगून बाळाला डॉक्टरला दाखवायचं असं सांगून महिला बाळाला घेऊन गेली. सदर महिला आपल्या बाळाला डाॅक्टरकडे न नेता त्याला घेऊन पसार झाली आहे हे आईच्या लक्षात येताच तिने पोलीस स्टेशन गाठले. त्यानंत घडलेला सर्व प्रकार पोलीसांना कथन केला.
सदर घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. इतकेच नाही तर परिसरात भीतीचे वातावरण पसरल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. या घटनेनंतर परिसरातील सर्वांना पोलिसांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पोलीसांना सदर हॉस्पिटलमध्ये असलेले संबंधित सर्व फुटेज ताब्यात घेतल्याचे समजत आहे. इतकेच नाही तर मुख्य म्हणजे याच फुटेजच्याआधारे आणि मिळालेल्या माहितीवरून पोलीस अधिकारी सदर आरोपी महिला आणि चोरून नेलेल्या बाळाचा शोध घेत आहेत.