खंडणीसाठी कपड्याच्या व्यापाऱ्यावर गोळीबार

उरुळी कांचन : पोलीसनामा ऑनलाइन – पंधरा दिवसांपूर्वी उरळी कांचन येथील वापारीमल सावलदास या कपड्याच्या दुकानाच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली होती. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोणी काळभोर पोलिसांनी दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केली असून खंडणीसाठी गोळीबार केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

ऋषभ उर्फ ऋषी रमेश बडेकर व दीपक दत्तात्रय धनकुटे (रा. दोघेही, उरुळी कांचन ता. हवेली) अशी  अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, दोन्ही आरोपी सोरतापवाडी (ता. हवेली) येथील कुप्रसिध्द गुंड विष्णू जाधव याचे सहकारी आहेत. विष्णू जाधव हा उरुळी कांचन परिसरातील गुंड अप्पा लोंढे यांच्या खून प्रकरणात येरवडा तुरुंगात असून, वरील दोघेही विष्णू जाधव याच्यासाठी काम करीत आहेत.

उरुळी कांचन गावातील महात्मा गांधी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर इंदर वापारीमल दर्डा यांच्या मालकिच्या ‘वापारीमल सावलदास’ या कपड्याच्या दुकानाच्या दिशेने 13 नोव्हेबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ऋषभ बडेकर व दीपक धनकुटे या दोघांनी दुकानच्या दिशेने गोळीबार केला होता. गोळीबार करण्यापूर्वी दोघांनी दर्डा यांच्याकडे खंडणीचीही मागणी केली होती. इंदर दर्डा यांच्या तक्रारीवरुन लोणी काळभोर पोलिसांनी वरील दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. गोळीबार केल्यानंतर दोघेही मोटारसायकलवरुन पसार झाले होते.

गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन, जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांना आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनेनुसार पोलिस यंत्रणा मागील पंधरा दिवसांपासून वरील दोघांचा शोध घेत होती. दरम्यान, ऋषभ बडेकर व त्याचा साथीदार दीपक धनकुटे हे दोघेजण मावळ तालुक्यातील शिंदेवाडी गावच्या हद्दीतील झाडीत ओळख लपवून राहत असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले, पोलिस उपनिरीक्षक चेतन थोरबोले, पोलिस उपनिरीक्षक महेश मुंडे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरीमकर, दयानंद लिमन यांनी मंगळवारी (ता. 27) सापळा रचून दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने पकडले. वरील दोघांनीही गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

उरुळी कांचन परिसरातील गुंड अप्पा लोंढे याचा साडेतीन वर्षांपूर्वी उरळी कांचन-जेजुरी मार्गावर खून झाला होता. या खुनाच्या आरोपावरुन मागील साडेतीन वर्षांपासून कोरेगाव मूळ येथील गोरख कानकाटे व सोरतापवाडी येथील विष्णू जाधव व त्यांचे काही सहकारी येरवडा तुरुंगात आहेत. तर ऋषभ उर्फ ऋषी रमेश बडेकर व दीपक दत्तात्रय धनकुटे हे दोघेजण एका महाविद्यालयीन युवकाचा खून केल्याप्रकरणणी येरवडा तुरुंगात होते. मात्र, वरील दोघांना न्यायालयाने काही अटींवर जामीन दिल्याने, मागील काही दिवसांपासून ऋषभ बडेकर व दीपक धनकुटे सध्या बाहेर फिरत होते.

या दरम्यान वरील दोघांनी अनेक व्यापाऱ्याच्या दुकानात जाऊन विष्णू जाधव याच्या नावाने खंडणीची मागणी केली होती. मात्र, अपवाद वगळता सर्वच बड्या व्यापाऱ्यांनी ऋषभ बडेकर व दीपक धनकुटे या दोघांना खंडणी देण्यास नकार दिल्याने, वरील दोघांनी १३ नोव्हेबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास गोळीबार केला होता.