Pune : भीषण अपघात ! बॅरिकेटला धडकून दुचाकीस्वाराचे शीर आणि धड झाले वेगळे

पुणे : महामार्गावर अपघात होऊ नये म्हणून मध्यभागी लावलेले बॅरिकेटच मोटारसायकलस्वारासाठी काळ ठरले. भरधाव जात असताना महामार्गावरील मध्यभागी असलेल्या बॅरिकेटला धडक बसल्याने भीषण अपघात होऊन त्यात दुचाकीवरील एकाचे शीर अन धड वेगळे झाले. तर दुसरा गंभीर जखमी झाला़.

दौंड येथील १६० क्रमांकाच्या मनमाड -सांगली महामार्गावरील बारामतीकडे जाणार्‍या लेनवर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अक्षय पांढरे(वय २५)असे दुचाकीस्वाराचे नाव आहे.

या महामार्गावरील गजानन सोसायटीच्या जवळील बारामतीकडे जाणार्‍या लेनच्या मध्यभागी गेल्या काही दिवसांपासून चेंबर तुटून तुंबले होते. त्यामुळे अपघात होऊ नये म्हणून बॅरिकेट लावले होते. वेगाने आलेल्या या मोटारसायकलस्वाराला हे बॅरिकेट दिसले नाही. त्याने बॅरिकेटला जोरात धडक दिली. हा अपघात इतका जोरात होता की, बॅरिकेटमुळे या मोटारसायकलस्वाराचे धड आणि शीर वेगळे झाले. शीर काही अंतरावर जाऊन पडले. त्याच्या मागे बसलेला सहचालकही जखमी झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच दौंड पोलीस घटनास्थळी गेले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. तर जखमीला जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.