मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा संपणार, ‘या’ नेत्यांचा लागणार नंबर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. शपथविधीच्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 15 दिवस उलटल्यानंतर देखील खातेवाटप करण्यात आले नव्हते. त्यामुळे बिन खात्याचे मंत्री अशी टीका मंत्र्यावर होत असल्याने नाराजीचा सुर निघत होता. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहा मंत्र्यांना खातेवाटप केले.

खातेवाटप झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या एका नेत्याने ट्विट करून हे खातेवाटप तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आणखी एका नेत्याने अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे सांगत खातेवाटपात बदल होऊ शकतो असे वक्तव्य केले होते. विधिमंडळ अधिवेशनात फटका बसू नये म्हणून अद्यापपर्य़ंत मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीतून अजित पवार आणि धनंजय मुंडे, तर काँग्रेसमधून दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित आहे. पण या नेत्यांशिवाय इतर काही नेते मंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

– शिवसेनेकडून दिवाकर रावते, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील यांची नावे आघाडीवर आहेत.

– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे यांची नावे आघाडीवर आहेत.

– काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अमीन पटेल, अशोक चव्हाण, अमित देशमुख, सतेज बंटी पाटील, विश्वजित कदम यांची नावे आघाडीवर आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/