मुंबईकरांच्या प्रोजेक्टमध्ये मीठाचा खडा टाकू नका, CM उध्दव ठाकरे यांनी भाजपला खडसावले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई मेट्रोची आरे येथील नियोजित कारशेड रद्द करून ती कांजूरमार्गला हलवण्याच्या निर्णयावरून सध्या राज्यातील सत्ताधारी सेना आणि विरोधी पक्ष असलेला भाजपामध्ये कलगीतुरा रंगला आहे. एकीकडे आरे येथील कारशेड रद्द करून कांजूरमार्ग येथे कारशेडच्या कामास (kanjurmarg-metro-car-shed) सुरुवात झाली असतानाच कांजूरमार्ग येथील जागा ही मिठागराची जागा असून, तिच्यावर आपली मालकी असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आरे येथील कारशेड कांजूरमार्गला नेली म्हणून टीका होत आहे. ती जमीन मिठागराची आहे, असा दावा केला जात आहे. या सगळ्याला समर्पक उत्तर देऊ. मात्र असे करून तुम्ही मुंबईकरांच्या प्रोजेक्टमध्ये मिठाचा खडा टाकता आहात. त्याचा काय इलाज करायचा तो करूच. पण आम्हीसुद्धा डोळे बंद करून काम करणारे नाही. तसेच जे जे मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचे असेल ते ते काम आम्ही करणार आहोत.

मधल्या काळात महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान केले होते. जगभर, देशात, राज्यात संकट असताना महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नाही. ड्रग्सची शेती केली जातेय असे वातावरण निर्माण केले गेले. ते आपण मोडून काढले आहे. तसेच जून महिन्यात 17 हजार कोटींचे सामंजस्य करार केले. अनेक देशी-विदेशी कंपन्या आल्या. गेल्या आठवड्यात अजून 35 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे, असेही ठाकरें यांनी सांगितले.

मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मंदिरे कधी उघडणार असा सवाल सातत्याने विचारला जात आहे. आता मंदिरसुद्धा उघडली जातील. दिवाळीनंतर आपण मंदिरे उघडण्याबाबत एक नियमावली करू. या नियमावलीमध्ये काय असेल तर गर्दी टाळली जावी. मंदिरे उघडली की तिथे गर्दी होऊ शकते. त्यामुळे धोका वाढू शकतो म्हणूनच मी जाणीवपूर्वक मंदिरे उघडण्यासाठी उशीर करत असल्याचे ते म्हणाले.