मुख्यमंत्री बनल्यानंतर उध्दव ठाकरेंची PM मोदींशी पहिलीच भेट, फडणवीसांसमोर पंतप्रधानांना अशा अंदाजात भेटले CM

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात होणाऱ्या डीजीपी आणि आयजीपीच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत. यासाठी पुण्यामध्ये त्यांचे आगमन झालेले आहे. यावेळी पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांशी असलेली ही पहिली भेट आहे.

का महत्वाची आहे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट
उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन केलेले आहे. त्यामुळे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे.

राज्यात सत्ता स्थापनेबाबत झालेल्या सर्व घडामोडी सर्वांनाच धक्का देणाऱ्या होत्या. सुरवातीला निवडणुकीत एकत्र लढलेले सेने भाजप यांच्यात मुख्यमंत्री पदावरून वाद झाले त्यानंतर भाजपने अजित पवारांच्या साहाय्याने सत्ता स्थापनेचा दावा करून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतली. मात्र अजित पवारांचे बंड हाणून पाडण्यात राष्ट्रवादीला यश आले. अखेर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपत घेतली होती.

तीन दिवस चालणार कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 ते 8 डिसेंबर पर्यंत पुण्यामध्ये डीजीपी आणि आईजीपी च्या संमेलनाला हजेरी लावणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत राज्य पोलिस दल, केंद्रीय अन्वेषण यंत्रणा, गुप्तचर संस्था आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांचे उच्च अधिकारी भाग घेतील आणि अंतर्गत सुरक्षेशी संबंधित विषयांवर चर्चा करतील.

पुण्यातील पाषाण भागात असलेल्या भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेच्या (आयआयएसआर) प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन केले गेलेले आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘गृह मंत्रालय दरवर्षी अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असते. यापूर्वी हे कार्यक्रम दिल्लीला होत असे, परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दरवर्षी विविध शहरांमध्ये कार्यक्रम घेण्यात येतात. गेल्या वर्षी गुजरातमधील केवडिया येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

Visit : Policenama.com