सावधान …! ‘उजनी’चे पाणी पिण्यासाठी ‘CANCEROUS’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे, सोलापूर ,अहमदनगर जिल्ह्यासहित मराठवाड्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणाच्या जलाशयाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचे पाणी सतत प्यायल्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे. अशी माहिती समोर आली आहे. विशेष  म्हणजे एका अभ्यासाअंती हा निष्कर्ष समोर आला आहे.
सोलापूर विद्यापीठाचा अभ्यास 
सोलापूर विद्यापीठानं उजनी जलाशयातील पाण्याचा शास्त्रशुध्द अभ्यास केला आहे. या अभ्यासाअंती उजनीच्या पाण्यात पारा, शिस आणि अनेक रासायनिक घटक आढळून आले आहेत. यामुळे उजनी धरणातील पाणी सतत पिल्याने कॅन्सर होण्याची शक्यता असल्याचा निष्कर्ष विद्यापीठातील संशोधकांनी काढला आहे. यामुळे चार जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याविषयी मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
उजनी धरणातून सोलापूरसह, उस्मानाबाद, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांना पाणीपुरवठा केला जातो. सोलापूर, पंढरपूर, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, कुर्डुवाडी, करमाळा आणि उस्मानाबाद या शहरांसह ४०० हून अधिक गावांना या धरणातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र हे पाणी माणसं आणि जनावरांनाही पिण्यायोग्य नाही, असा निष्कर्ष निघाल्याने खळबळ उडाली आहे.
उजनीचे पाणी प्रदूषित 
सोलापूर विद्यापीठातील संशोधकांनी उजनी धरणातील पाण्याचे आठ नमूने संकलित केले. एका टीमनं पाण्याचं रासायनिक पृथकरण केले. पाण्यात डिझाल ऑक्सिजन, बायोकेमिकल ऑक्सिजन, केमिकल ऑक्सिजन डिमांड, नायट्रेट आणि सल्फेट आढळून आले, असल्याचे संशोधकांनी सांगितलं आहे.
भीमा नदीच्या खोऱ्यावर उजनी धरणाची जोपासना होते. पुणे, भिगवण, इंदापूर इथल्या औद्योगिक वसाहतीतून दूषित पाणी धरणात येऊन मिळते. आजूबाजूच्या शेतीला दिलेली खतं, कीटकनाशकं मिश्रित पाणी धरणात येऊन धरणातील दूषित होते. सध्या धरणात शिसे, पारा आणि अत्यंत घातक रासायनिक घटक अडवून आले आहेत, असे प्रकल्प संचालक डॉक्टर गौतम कांबळे यांनी सांगितले आहे.
आजवर झालेला पहिलाच अभ्यास 
धरणाच्या पाण्याचा आजवर झालेला हा पहिलाच शास्त्रशुद्ध अभ्यास आहे. उजनी धरणाचं पाणी दूषित आहे, याची चर्चा होतीच. मात्र आता त्यावर सोलापूर विद्यापीठाने शिक्कामोर्तब केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शहर आणि या गावांच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पात उजनीचं हे दूषित पाणी स्वच्छ करण्याची क्षमता नाही. त्यामुळे कॉलरा, मलेरिया आणि पचन क्षमता कमी होण्याचे रोग होऊ शकतात. तसेच कॅन्सरचाही धोका असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.
मृतसाठ्यात सर्वात मोठे धरण
पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात भीमानगर या गावाजवळ, भीमा नदीवरचे हे एक मोठे धरण आहे. याचे पाणी पुढे नीरा-नृसिंहपूर येथे नीरा नदीला जाऊन मिळते. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव धरण उजनीला ‘यशवंतसागर’ असेही संबोधले जाते. उजनी धरण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता १५१७ गिगालिटर्स (GigaLitres) एवढी प्रचंड आहे.  क्षमतेच्या बाबतीतला या धरणाचा क्रमांक कोयना व जायकवाडी यांच्याआधी पहिला लागतो. या धरणात पोचणारे पाणी थेट पुण्याच्या मुळा-मुठा सारख्या अनेक नद्यांमधून येते. मोठी जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो.