जुगार अड्ड्यावर कारवाई टाळण्यासाठी 1 लाख 40 हजाराची लाच घेताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जुगार अड्ड्यावर कारवाई न करण्यासाठी तब्बल 1 लाख 40 हजार रूपयाची लाच घेणार्‍या पोलिस कर्मचार्‍याला ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रात्री 11 वाजता अटक केली. पोलिस कर्मचारी एवढ्या मोठया प्रमाणावर लाच घेताना रंगेहाथ पकडला गेला असल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

प्रशांत चतुर्भुज असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. त्यांच्याविरूध्द हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरच्या पुर्वेकडील जुगार अड्ड्यावरील कारवाई टाळण्यासाठी चतुर्भुज यांनी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाचेबाबत तक्रार नोंदवली. त्यानंतर प्राप्त तक्रारीची पडताळणी करून हा सापळा रचण्यात आला. प्रशांत चतुर्भुज हे मध्यवर्ती पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

दरम्यान, परिसरातील काही राजकीय पदाधिकारी, तथाकथित समाजसेवक आणि पत्रकार यांच्या आशीर्वादाने खुलेआम काही जुगार अड्डे चालु असल्याची चर्चा शहरात आहे. दरम्यान, अ‍ॅन्टी करप्शनने ही धडक कारवाई केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.