‘A आणि B’ फॉर्म म्हणजे काय ? का असतो महत्त्वाचा ? जाणून घ्या (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुका जवळ येतायत. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादीही जाहीर केली जाताना दिसतेय. पक्षाची आमदारकी पाहिजे असेल तर त्यासाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे एबी फॉर्म. तुम्ही ऐकलं असेलंच की, आमुक एका पक्षाने उमेदवाराला एबी फॉर्म दिला.

परंतु हा एबी फॉर्म नेमका आहे तरी काय आणि तो का दिला जातो ?
थोडक्यात सांगायचं झालं तर, ज्या उमेदवाराला एबी फॉर्म दिला जातो तो पक्षाचा अधिकृत उमेदवार समजला जातो. त्याला पक्षाचं अधिकृत चिन्हंही दिलं जातं. उमेदवारी अर्ज भरताना सर्व गोष्टी काटेकोरपणे तापसल्या जातात. त्यात एबी फॉर्म हा सर्वात महत्त्वाचा असतो. उमेदवारीच्या वेळी पक्षाचा उल्लेख करणाऱ्या उमेदवाराला एबी फॉर्म द्यावाच लागतो. जर उमेदवार एबी फॉर्म सादर करू शकला नाही तर त्याचा दावा न्यायालयदेखील ग्राह्य धरत नाही.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एबी फॉर्ममधील ए फॉर्म हा वेगळा आणि बी फॉर्म हा वेगळाय.

काय आहे ए फॉर्म ?
एखाद्या पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरवताना त्याला संबंधित पक्षाकडून ए फॉर्म दिला जातो. ए फॉर्मवर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते. या फॉर्ममध्ये उमेदावाराचं नाव, पक्षातील त्याचं पद, कोणत्या मतदारसंघातून तो पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. याची माहिती द्यावी लागते. अर्ज भरताना सगळी कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक द्यावं लागतं. अधिकृत उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर छाननीवेळी त्यात काही त्रुटी निघाल्या तर तो अर्ज बाद ठरतो आणि पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडतो.

काय आहे बी फॉर्म
अधिकृत उमेदवार काही कारणास्त्व निवडणूक लढवण्यास सक्षम नसेल तर, कोणीतरी पर्यायी उमेदवार असावा या हेतूने संबंधित पक्षाकडून बी फॉर्म दिला जातो. यात प्रथम पसंतीच्या उमेदवारासह पर्यायी उमेदवाराचं नाव दिलेलं असतं. पडताळणीदरम्यान उमेदवाराचा अर्ज जर बाद ठरला किंवा त्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला तर पर्यायी उमेदवार संबंधित पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतो.

राज्यसभा किंवा विधानपरिषद निवडणुकीसाठी हे फॉर्म एए आणि बीबी म्हणून ओळखले जातात.

कोणता पक्ष एबी फॉर्म देऊ शकतो ? उमेदवाराला हे अर्ज कुणाकडे आणि कुठे जमा करावे लागतात ?

राष्ट्रीय, राज्य पातळीवरील किंवा केवळ निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेला कुठलाही पक्ष हे फॉर्म उमेदवाराला देऊ शकतो. उशिरात उशिरा म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत हे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं.

तसंच पक्षाच्या शिक्क्यासह पक्षाचे प्रमुख, सचिव किंवा पक्षाने जबाबदारी सोपविलेल्या व्यक्तीची सही त्यावर असणं गरजेचं असतं. संबंधित व्यक्तीच्या सहीचा शिक्का, झेरॉक्स चालत नाही. फॅक्सने पाठविलेले अर्जही ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे अधिकृत उमेदवार जाहीर केल्यावर पक्ष संबंधित उमेदवाराला केवळ सही करून उमेदवाराचं नाव न टाकलेले अर्ज देऊन टाकतात.

Visit : Policenama.com