तब्बल 26 वर्षांनंतर तलावाच्या बाहेर आलं इटलीतील ‘हे’ गाव, ‘यामुळं’ पाण्यात बुडवण्यात आलं होतं, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इटलीमधील एक गाव तब्बल 26 वर्षानंतर तलावातून बाहेर आले आहे. आता इटालियन सरकार आशा करीत आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस या मध्ययुगीन ऐतिहासिक गावाला पाहण्यासाठी पर्यटक जाऊ शकतील. हे गाव गेल्या 73 वर्षांपासून तलावात बुडले आहे. काही लोक म्हणतात की या गावात शापित आत्मा आणि भुते होती, म्हणून या गावास तलाव बांधून त्यात बुडविण्यात आले होते. या गावाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया…

फॅब्रीश डी केरेगजिन (Fabbriche di Careggine) असे या गावाचे नाव आहे. हे गाव 1947 पासून वागली तलावामध्ये बुडलेल्या अवस्थेत आहे. 73 वर्ष पाण्यात असलेले हे गाव आतापर्यंत फक्त चार वेळा म्हणजेच 1958, 1974, 1983 आणि 1994 मध्ये दिसले आहे. आता 26 वर्षांनंतर या तलावाचे पाणी पुन्हा कमी होत असून हे गाव बाहेर येत आहे. फॅब्रीश डी केरेगजिन या गावाबद्दल म्हटले जाते की 13 व्या शतकात हे गाव वसले होते. या गावातून लोहाची निर्मिती होत होती. येथे लोखंडाचे काम करणारे लोहार राहत होते.

इटलीमधील लूका प्रांतातील टस्कनी शहरात असलेले हे गाव पाहण्याची संधी 26 वर्षानंतर परत येत आहे. हे गाव नेहमीच 34 दशलक्ष घनमीटर पाण्यात बुडलेले असते. 1947 मध्ये या गावात धरण बांधले गेले होते. असे म्हटले जाते की येथे भुते होती म्हणून या गावास पाण्यात बुडवण्यात आले. आता धरण चालवणाऱ्या कंपनीने सांगितले की आम्ही हळूहळू तलावाचे पाणी रिकामे करीत आहोत. जेणेकरून थोडी स्वच्छता करता येईल. हे काम पुढील वर्षापर्यंत पूर्ण होईल.

येथे 1947 मध्ये जेव्हा जलविद्युत धरण बांधले गेले तेव्हा इथल्या रहिवाशांना जवळच्या वागली डी सोटो या गावी हलवण्यात आले. जेव्हा फॅब्रीश डी केरेगजिन गाव बाहेर येईल तेव्हा लोकांना त्यात 13 व्या शतकातील इमारती दिसतील. या इमारती दगडांनी बांधल्या गेल्या आहेत. या गावात आजही चर्च, स्मशानभूमी आणि दगडी घरे दिसतात. वागली डी सोटोचे माजी नगराध्यक्ष म्हणाले की, पाणी कमी पडताच लोक ते पाहण्यासाठी येतील. जेव्हा तलाव रिक्त असतो तेव्हा लोक या गावात फिरण्यास येत असतात.

https://twitter.com/Julioac13/status/1268687849437741056

इनेल कंपनीने म्हटले आहे की ते हा तलाव रिकामा करतील व काही दिवस गाव परत उघडे करतील जेणेकरून परिसराचे पर्यटन वाढू शकेल. तसेच, तलाव स्वच्छ करता येईल आणि अशा जुन्या धरणाची काही दुरुस्तीही करता येईल.