बडतर्फ शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीच्या मोर्चात, आ. संग्राम जगतापांची दांडी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आयोजित केलेल्या बेरोजगार मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ झालेले शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते हे सहभागी झाले होते. मात्र, पक्षाचे आ. संग्राम जगताप यांनी वैद्यकीय कारण देत दांडी मारली होती.

पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, आ. अरुण जगताप, माजी आमदार दादा कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी नेत्यांसह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. राज्यातील अनेक विभागांमधील नोकरभरती रखडल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर मोठा अन्याय होत आहे. बेरोजगार तरुणांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवकांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात पक्षाचे निरीक्षक व जिल्हाभरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पक्षातून हकालपट्टी केलेले शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते मोर्चात सहभागी झाले होते. पक्षनिरीक्षक समोरच त्यांच्या उपस्थितीचे दृश्य चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.

पक्षाचे आमदार अरुण जगताप हे मोर्चात सहभागी झाले होते. मात्र त्यांचे सुपुत्र आ. संग्राम जगताप यांनी दांडी मारली होती. त्यांच्यावर एक किरकोळ शस्त्रक्रिया झाल्याने अनुपस्थित राहिले, असे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात होते.

खरच कारवाई की मलमपट्टी ?
आजच्या मोर्चात बडतर्फ शहर जिल्हाध्यक्षाने हजेरी नोंदविल्याने पक्षश्रेष्ठींनी केलेली कारवाई खरोखरच कारवाई केली की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केवळ कारवाईच्या सोपस्कराची मलमपट्टी केली की काय, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. हा मोर्चा मोर्चा मुद्द्यापेक्षा उपस्थिती व अनुपस्थितीवरूनच चांगलाच चर्चेचा ठरला.