‘भारताच्या पराभवासाठी फलंदाजांना दोष देणे योग्य नाही’

पोलीसनामा ऑनलाईन- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिसऱ्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये भारताचा दुसरा डाव अवघ्या 36 धावात गुंडाळला गेला. ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून भारतावर मात करत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने आपली निच्चांकी धावसंख्याही यादरम्यान नोंदवली आहे. दरम्यान सोशल मीडियावर भारतीय चाहते संघाच्या कामगिरीवर नाराज असताना माजी खेळाडू सुनिल गावसकर यांनी मात्र फलंदाजांना दोष देणे योग्य ठरणार नाही, असे म्हटले आहे.

इतक्या कमी धावसंख्येवर बाद होण्याची वेळ येणे हे कोणत्याही संघासाठी फारसे चांगले नाही. पण या जागेवर भारताऐवजी दुसरा संघ असता तर त्याचीही अशीच परिस्थिती झाली असती. कदाचीत तो संघ 36 नाही पण 70-72 मध्ये नक्कीच बाद झाला असता. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी केली, या पराभवासाठी भारतीय फलंदाजांना दोष देणे योग्य नाही, असे गावस्कर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

विजयासाठी मिळालेले 90 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केले. मॅथ्यू वेड आणि बर्न्स यांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. जो बर्न्सने नाबाद 51 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.