दुर्देवी ! आईच्या मृत्यूनंतर अवघ्या 10 दिवसांमध्येच महिला प्रोफेसरचा कोरोनामुळं मृत्यू

नवी दिल्लीः वृत्त संस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने बेड्स, ऑक्सिजन, इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. वेळेत उपचार मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. अशातच जामिया मिलिया इस्लामिया येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. नबीला सादीक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर ट्विटरवरून स्वत:साठी आयसीयू बेड्सची मागणी केली होती. दरम्यान 10 दिवसांपूर्वीच नबीलाच्या आई नुझाट यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

डॉ. नबीला सादीक या जेएनयूमधील पीएचडीधारक होत्या. 20 एप्रिलपर्यंत डॉ. नबीला या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी मदत करत होत्या.10 दिवसांपूर्वीच नबीलाच्या आई नुझाट यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर त्यांचे वडीलही कोरोनाबाधित होते. त्या आईवडीलांमुळे चिंतेत होत्या. 2 मे रोजी त्यांनी ट्विट करून म्हटले होते की, अशीच परिस्थिती राहिली तर दिल्लीत एकही माणूस जिवंत राहणार नाही. जामियामधील एम. एचा विद्यार्थी लाराईब नेयाझी याने सांगितले की, ज्यावेळी आम्हाला मॅडमच्या तब्येतीची माहिती मिळाली. त्यावेळी मी काही सहकारी विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या घरी गेलो.

त्यानंतर आम्ही मॅडमसाठी बेड शोधू लागलो. त्यानंतर अल्शिफा हॉस्पिटलमध्ये आम्हाला बेड मिळाला. त्याठिकाणी कोविड चाचणी केल्यावर ती पॉझिटिव्ह आली. याचदरम्यान नबीलांच्या आईचे निधन झाले. परंतु मॅडमची अवस्था गंभीर असल्याने त्यांना सांगितले नव्हते. त्याचेळी नबीला यांची प्रकृतीही चिंताजनक बनली. आम्ही दिल्ली-NCR मधील हॉस्पिटल्सना ऑक्सिजन बेडसाठी कॉल केला होता. शनिवारी रात्री डॉ. नबीला यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. परंतु औषध उपचारांना त्या प्रतिसाद देत नव्हत्या. अखेर सोमवारी डॉ. नबीला यांचा मृत्यू झाला. मंगळवारी काही सहकारी आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांच्यार अंत्यसंस्कार करण्यात आले.