दुर्देवी ! कोरोनामुळं 24 तासात 50 डॉक्टरांचा मृत्यू, आतापर्यंत 1000 जणांनी गमावला जीव

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाची अवस्था बिकट केली आहे. बाधितांच्या वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच मृत्यूचेही प्रमाण अधिक आहे. कोरोनाचा फटका केवळ सर्वसामान्य लोकांनाच नाही तर कोरोनविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांनाही बसला आहे. या संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनने माहिती दिली असून त्यानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २४४ डॉक्टरांनी जीव गमावला असून रविवारी ५० डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे म्हंटले आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण बिहारमध्ये आहेत तेथे ६९ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेश (३४), दिल्ली (२७) यांचा क्रमांक लागतो. महत्त्वाचे म्हणजे यापैकी केवळ तीन टक्के डॉक्टरांचे लसीकरण झाले असल्याचे समोर आले आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन ही फक्त त्यांच्याकडे नोंदणी असलेल्या साडेतीन लाख लोकांचे रेकॉर्ड ठेवत असते. त्यामुळे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे एक हजार डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. परंतु देशात डॉक्टरांची संख्या १२ लाखाहून अधिक आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या मृत्यूची संख्या अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दिल्लीतील गुरू तेग बहादूर रुग्णालयातील २६ वर्षीय डॉक्टरला कोरोनामुळेच आपला जीव गमवावा लागला. अनस मुजाहिद असे या डॉक्टरचे नाव असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जीव गमावणाऱ्या डॉक्टरांपैकी ते सर्वात तरुण डॉक्टर आहेत. गत वर्षी पहिल्या लाटेत ७३६ डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत देशातील एक हजार डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे.

अनसला घसा दुखणे अशी काही मध्यम लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी केली असता ती बाधित आली. काही वेळातच तो खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचे लसीकरण झाले नव्हते. अनसच्या मृत्यू नंतर त्याचा मित्र डॉक्टर आमिर सोहेलला जबर धक्का बसला आहे. ते म्हणाले त्याच्या मृत्यूमुळे आम्हाला धक्का बसला आहे. हे असं कसं झालं हेच आम्हाला अजून समजत नाही. तर अनसला कोणतीही व्याधी नव्हती किंवा आरोग्याबाबत कोणतीही समस्या नव्हती. त्याच्या मृत्यूमुळे आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे, असे अनसच्या कुटूंबियानि सांगितले. गेल्या पाच महिन्यापासून देशात लसीकरण मोहीम सुरू आहे मात्र अद्यापपर्यंत ६६ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले नाही.

दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर जयेश लेले यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की , एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २४४आणि रविवारी ५० डॉक्टरांनी कोरोनाने जीव गमावणे हे आमच्यासाठी खूप दुर्दैवी आहे. डॉक्टरांची संख्या खूप कमी असून त्यांच्यावर प्रचंड ताण आहे. विश्रांती न घेता ४८ तास सलग काम करत असल्याने त्यांच्या त्रासात भर पडत आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर मृत्यू होत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सरकारने काही उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही लेले यांनी सांगितले.