दुर्दैवी ! ‘कोरोना’मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून नुकतेच सन्मानित झालेले जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील रहिवाशी आणि पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे आज पहाटे कोरोनामुळे निधन झाले.

राजेंद्र सरग यांना गेल्या रविवारी कोरोनाची लागण झाली होती. त्यात त्यांना उच्च मधुमेह असल्याचे दिसून आले. उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज पहाटे यांची प्राणज्योत मालवली.

कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राजेंद्र सरग यांचा नुकताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता.

सरकारी अधिकारी व त्यांची पत्रके ही रुक्ष असतात, असा समज राजेंद्र सरग यांनी खोडून काढला. विविध विषयावर त्यांना रुची होती. लेखनाबरोबर व्यंगचित्र काढण्याची त्यांना आवड होती.

सरग यांना आद्य पत्रकार देवर्षी नारद व्यंगचित्रकारिता पुरस्कार, सूर्य गौरव पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, राज्यस्ततीय चौथा स्तंभ व्यंगचित्रकारिता पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात ९ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. मात्र, त्यापूर्वीपासून प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या योजनांची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांपर्यंत अचूक आणि तात्काळ पोहोचवण्यात माहिती कार्यालय आघाडीवर होते.

लॉकडाऊनच्या काळात अधिकृत माहितीसाटी ट्विटर , फेसबुक, व्हॉटसअप तसेच ई मेलच्या माध्यमातून त्यांनी अधिकृत माहिती पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला.