रस्त्यावर फेकलेल्या तान्हुल्याला वर्दीतल्या आईने दिले जीवदान

बंगळूर :वृत्तसंस्था

मातृत्व ही स्त्री ची सर्वात मोठी शक्ती असते असे म्हंटले जाते. याचाच प्रत्यय बंगळूर मधील एका घटनेवरून आला आहे. एका जन्मदात्या आईने आपल्या नवजात बाळाला रस्त्यावर फेकले होते. पण त्या बाळाचे प्राण वाचवण्यासाठी एक महिला पोलीस धावून आली आणि तिने स्वतःचे दूध पाजून त्या नवजात मुलाला वाचवल्याचे वृत्त आहे. डी.एस. अर्चना असे त्या महिलेचे नाव असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. अर्चना यांना पाच महिन्याचे बाळ असून त्या नुकत्याच गरोदरपणाच्या रजेवरुन पुन्हा रुजू झाल्या आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, १ जून रोजी बंगळुरुमधील दोडाथगुरु भागातील एका इमारतीचे काम सुरु असलेल्या ठिकाणी एक बेवारस बाळ सापडल्याचे एका व्यक्तीने पोलिसांना कळविले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स सिटी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी एका प्लास्टिकच्या पिशवीत एक बाळ गुंडाळून ठेवल्याचे त्यांना आढळून आले. पोलिसांच्या पथकात असलेल्या अर्चना यांनी त्या बाळाला स्वता: जवळ घेतले. त्यानंतर पोलीस त्या बाळाला घेऊन रुग्णालयात गेले. डॉक्टर त्या बाळावर उपचार करत असतानाच बाळ जोरजोरात रडू लागले. त्यावेळी बाळासोबत रुग्णालयातच थांबलेल्या अर्चना यांनी बाळाला शांत करण्यासाठी कसलाही विचार न करता बाळाला स्वत:चे दूध पाजले. आईच्या दूधाची आस धरुन बसलेल्या त्या बाळाला अर्चना यांनी दूध पाजल्याने ते देखील शांत झाले व लगेच झोपी गेले. अर्चना यांच्या या उदार मातृत्वाचे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी देखील कौतुक केले आहे.

यासंदर्भात बोलताना महिला पोलीस म्हणाल्या की, ‘माझे बाळ देखील पाच महिन्याचे आहे. त्या बाळाला असे बेवारस टाकलेले बघून मला फार वाईट वाटले त्या बाळाला भूक लागली होती म्हणूनच ते रडत होते. माझ्यातले मातृत्व मला त्या बाळाला रडताना बघून शांत कसे राहू देणार होते. त्यामुळे पुढचा मागचा कसलाही विचार न करता मी त्या बाळाला दूध पाजले. मी याहून जास्त त्या बाळासाठी काय करणार होते. जेव्हा मी त्या बाळाला दूध पाजत होते तेव्हा मला मी माझ्या बाळालाच दूध पाजतेय असे वाटले’, असे अर्चनाने प्रसारमाध्यमांना सांगितले.

या बाळावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला शिशू विहारमध्ये पाठविण्यात आले असून पोलीस या बाळाच्या पालकांचा शोध घेत आहेत.