अनोखे आंदोलन चक्क शेळी बकरीचे लग्न लावत सरकारचा केला निषेध

मोरगाव : पोलीसनामा ऑनलाईन – बारामती तालुक्यातील जिरायत दुष्काळी भागाला जानाई शिरसाई योजनेचे पाणी
मिळावे या प्रमुख मागणीसाठी उंडवडी ता.बारामती येथे सुरू असलेल्या काल आंदोलनाच्या चौथ्या दिवशी
आंदोलकांनी शेळी व बोकडाचे थाटामाटात लग्न लावत शासनाच्या नाकर्तेपणाचा जाहीर निषेध केला. शेळी
व बोकडांच्या लग्नात जमा झालेल्या आहेराची रक्कम शासनाला पाठविण्याची असल्याने या आंदोलनाची
काल दिवसभर तालुक्यात एकच चर्चा सुरू होती.

जानाई शिरसाई सिंचन योजनेचे पाणी बारामती तालुक्याच्या दुष्काळी जिरायत भागाला मिळावे या प्रमुख

मागणीसाठी तालुक्यातील उंडवडी या ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून जनआंदोलन सुरू आहे. परंतु गेल्या
चार दिवसांपासून ही शासनाने या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नसल्याने आंदोलक संतप्त झाले.
आधी मग शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध म्हणून चक्क आंदोलनाच्या मंडपातच गावातील एका शेळी व
बोकडाचे लग्न लावण्यात आले.

आंदोलनस्थळी लावण्यात आलेल्या शेळी व बोकडाच्या लग्नाच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाला परिसरातून

उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लग्न सोहळ्यात उपस्थित आंदोलकांनी सुमारे ६८७ रुपयांचा आहेर जमा
करत शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध केला. या लग्न सोहळ्यावर वेळी जमा झालेली आहेराची रक्कम
शासनाला पाठवण्यात येणार असल्याने या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची तालुक्यात दिवसभर एकच चर्चा
रंगली होती.