सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे होणार अपग्रेड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याच्या पर्यायाने पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी तसेच वाहतुक नियंत्रणासाठी पुणे स्मार्ट सिटीच्यावतीने सिलेक्शन ऑफ अ सिस्टिम इंटीग्रेटर फॉर इंटेलिजन्स व्हिडीओ ऍनालिसिस ऍन्ड सिटी सर्वेलन्स प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत शहरातील सर्व रस्ते आणि सार्वजनिक जागांवर बसविण्यात आलेल्या कॅमेर्‍यांचे अपग्रेडेशन होणार असून सतर्क पोलिसिंगसाठी याचा वापर केला जाणार आहे.

कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी आणि जंगली महाराज रस्त्यावरील बॉम्बफोटांच्या घटनानंतर शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच कॅमेर्‍यांची उपयुक्तता लक्षात घेउन महापालिकेने नदी घाट व सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. चौकांमध्ये बसविलेल्या कॅमेर्‍यांची कंट्रोल रुम सध्या पोलिस आयुक्तालयात असून पावसाळ्यात धोकादायक ठरणारे नदी काठ आणि काही महत्वाचे रस्ते यांची दृश्य पाहता यावीत यासाठी महापालिका भवन येथेही सुविधा करण्यात आली आहे. यासोबतच घरफोडीसारख्या गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी व्यावसायीक आणि सोसायट्यांनीही त्यांच्या आवारात व्यक्तिगत पातळीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

या सगळ्या सीसीटीव्हींमधील नोंदी एकाच ठिकाणी पाहता येणे शक्य व्हावे यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्यावतीने पुढाकार घेण्यात आला आहे. या कामासाठीची निविदाही काढण्यात आली आहे. प्रामुख्याने दहशतवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर येणार्‍या धमकीच्या कॉल्सच्या दृष्टीने सर्वेलन्ससाठी याचा पोलिस दलाला उपयोग होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या गुन्ह्यांमध्ये आरोपींना जेरबंद करून त्यांना शिक्षा करण्यासाठीही सीसीटीव्ही फुटेजचा उपयोग होणार आहे.

शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमधील वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी सीसीटीव्हींची मदत घेतली जाणार आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवरही वचक ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचणे तसेच आरोग्याच्या दृष्टीने ग्रीन कॉरीडॉरच्यावेळी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा उपयोग करुन घेणे शक्य होणार असल्याने सध्याची यंत्रणा अपग्रेड आणि अधिकाअधिक सीसीटीव्हींतून इमेजेस आणि व्हिडीओ मिळविणे शक्य व्हावे यासाठीच या यंत्रणेचा उपयोग होईल, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने नमूद केले.