UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! मिळणार आणखी एक संधी

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. UPSC ज्या उमेदवारांनी ऑक्टोबर 2020 मध्ये शेवटची (Last Attempt) परीक्षा दिली होती. अशा उमेदवारांना आणखी एक संधी देण्यास केंद्र सरकारने सहमती दर्शवली आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला थेट भारत सरकारच्या सेवेत सामावून घेतले जाते. आता सरकारने या उमेदवारांसाठी आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण या संधीचा लाभ ज्या उमेदवारांनी ऑक्टोबर 2020 मध्ये शेवटची परीक्षा दिली होती अशाच उमेदवारांना घेता येणार आहे. तसेच ही परीक्षा देण्यासाठी लागणारी वयाची अटही या उमेदवारांसाठी शिथिल करण्यात आली.

दरम्यान, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग या विभागाने 25 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यामध्ये त्यांनी ऑक्टोबर, 2020 मध्ये ज्या उमेदवारांनी UPSC परीक्षेसाठी शेवटाचा प्रयत्न केला होता, अशा उमेदवारांना आणखी एक संधी द्यावी, असे सांगितले होते. त्यानंतर आता याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

सहावेळा दिली जाते परीक्षेची संधी

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या जनरल कॅटेगरीच्या उमेदवाराला वयाच्या 32 वर्षांपर्यंत सहावेळा संधी दिली जाते. तर आरक्षित वर्गासाठी काही प्रमाणात सूट दिली जाते.