लोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ‘संसद’ प्लॅस्टिक मुक्तीकडे !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा सचिवालयाने आजपासून संसदेच्या आवारात अपुनर्वापरनीय प्लॅस्टिक पाण्याच्या बाटल्या आणि इतर प्लॅस्टिक वस्तू वापरण्यास मंगळवारपासून बंदी घातली आहे. या घोषणेनंतर लोकसभेत मंगळवारपासून प्लॅस्टिकचे साहित्य वापरता येणार नसल्याचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. ७३ व्या स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री मोदींनी प्लॅस्टिकमुक्तीच्या केलेल्या आवाहनाच्या पार्श्ववभूमीवर हा निर्णय झाल्याचे दिसते.

सचिवालय आणि संसद भवन संकुलात कार्यरत असलेल्या इतर संबंधित एजन्सीतील अधिकारी व कर्मचार्‍यांना या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे, असे सचिवालयाने एका निवेदनात म्हटले आहे. पर्यावरण अनुकूल बायोडिग्रेडेबल बॅग आणि इतर साहित्य वापरण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे.

“लोकसभा सचिवालयाने केलेला हा उपक्रम पंतप्रधानांनी देशाला प्लॅस्टिकपासून मुक्त करण्याच्या आवाहनाच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे,” असे या निवेदनात म्हटले आहे.

प्रधानमंत्री मोदींनी केली होती घोषणा :
१५ ऑगस्ट रोजी ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करताना १ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांनी एकल-वापर प्लास्टिकचा (पुनर्वापर न करता येणारे) वापर सोडून देण्याचे आणि हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचे आवाहन केले. त्यानुसार २ ऑक्टोबर पासून सर्व सरकारी कार्यालयात प्लॅस्टिक बंदी सक्तीची असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त