अयोध्या : इकबाल अन्सारी यांचे आवाहन – बाबरी विध्वंसातील सर्व आरोपींना सोडावे

अयोध्या : वृत्तसंस्था – बाबरी विध्वंस प्रकरणात आता 30 सप्टेंबरला निर्णय होणार आहे आणि निर्णयाच्या अगोदर बाबरी मशिदीचे माजी पक्षकार असलेले इकबाल अन्सारी यांनी सर्व आरोपींना निर्दोष सोडावे तसेच राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीची सर्व प्रकरणे संपुष्टात आणण्याची विनंती केली आहे. बाबरी पक्षकार इकबाल अन्सारी यांनी म्हटले की, हे प्रकरण सुप्रीम कोर्टात होते आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा आला आहे. निर्णय मंदिराच्या बाजूने आला आहे. बाबरी विध्वंसाच्या खटल्यात अनेक लोकांची सुनावणी झाली आहे आणि अनेक लोक असे आहेत जे या जगात नाहीत. जे लोक शिल्लक आहेत ते ज्येष्ठ आहेत. आमची इच्छा आहे की, बाबरी मशिदीच्या नावावर जेवढे खटले आहेत ते बंद केले पाहिजेत.

इकबाल अन्सारी यांनी म्हटले की, अयोध्या प्रकरण हिंदू आणि मुस्लिम यांच्यात वादाचे कारण ठरले होते आणि ते राजकारणात आले. आता सुप्रीम कोर्टाकडून निर्णय आला आहे, तर सरकारने हे प्रकरण पूर्णपणे संपवावे. आमची इच्छा आहे की, हिंदू आणि मुस्लिमांनी मंदिर आणि मशिदीच्या नावावर कोणतेही असे काम करू नये, जे देशाच्या प्रगतीत अडथळा बनू शकते. आपल्या देशात बाबरी मशिद आणि राम जन्मभूमी प्रकरणात जेवढी प्रकरणे आहेत, ती लवकरात लवकर समाप्त करावीत.

हे आहेत आरोपी
या प्रकरणात माजी उप पंतप्रधान आणि गृहमंत्री लाल कृष्ण आडवाणी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, राजस्थानचे माजी राज्यपाल आणि यूपीचे माजी सीएम कल्याण सिंह, भाजपा नेते विनय कटियार, माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशच्या माजी सीएम उमा भारती, साध्वी ऋतंभरा यांच्यासह 32 लोकांना आरोपी बनवण्यात आले आहे. या प्रकरणी 1 सप्टेंबरपासून सीबीआयच्या विशेष न्यायालयात दोन्ही पक्षांकडून तोंडी म्हणणे मांडण्यात आले आहे. ज्यानंतर आता सीबीआयचे विशेष जज सुरेंद्र कुमार यादव यांनी आपला निर्णय लिहिण्यास सुरूवात केली आहे. बाबरी विध्वंस प्रकरणात सुप्रीम कोर्टाने कोणत्याही स्थितीत 30 सप्टेंबरपर्यंत आपला निर्णय सुनावण्याचा आदेश सीबीआयच्या विशेष न्यायालयास दिला होता.