कोरोना संकटात नाती झाली पोरकी ! शेजाऱ्यांचा ‘खांदा’ देण्यास नकार; पती एकटाच सायकलवर …

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या या संकटात नाती पोरकी झाली आहेत. कुटुंबीय, नातेवाईक कुणीही मदतीला येत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर सख्खे नातलग अंतिम दर्शनालाही येत नाहीत. अशावेळी उत्तरप्रदेशातील जौनपूरच्या पोलिसांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. मृत पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी गावातून एकही माणूस पुढे न आल्याने पतीने मृतदेह सायकलवर ठेवला अन् आणि नदीकाठी जाऊ लागला. माहिती मिळताच पोलिसांनी अंत्यंसंस्कारांचे सामान आणि मृतदेह घाटावर नेण्यासाठी वाहन पुरवले.

उत्तर प्रदेशातील अंबरपूर गावातील ही घटना आहे. टिळकधारी सिंग यांची पत्नी राजकुमारी (वय 56 ) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. रुग्णालयातून रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन टिळकधारी गावात पोहोचले. त्यांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीवर नेण्यासाठी शेजा-याकडे मदत मागितली. परंतु कोरोनाने मृत्यू झाल्याचे समजताच कोणीही समोर आले नाही. शेवटी टिळकधारी यांनी बायकोचा मृतदेह सायकलवर ठेवून अंत्यसंस्कारासाठी गावातील नदीकाठावरील रामघाटाकडे निघाले. याची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत टिळकधारी सिंग यांना मदत केली. मृतदेहासाठी वाहन तयार केले आणि सामान पुरवले. त्यानंतर मृतदेह रामघाटाकडे पाठविला. इतकेच नाही तर अंत्यसंस्कारासाठी पैसेही दिले. पोलिसांच्या या कामाला कडक सलाम ठोकला पाहिजे.