Coronavirus Vaccine : ऑक्सफोर्डच्या वॅक्सीनचं दुसर्‍या टप्प्यातील मानवी परीक्षण पुण्यात सुरू, डॉक्टर – Phd उमेदवारांना दिला पहिला ‘डोस’

पुणे : वृत्तसंस्था – ऑक्सफोर्डच्या कोविड-19 लसीची माणसांवरील दुसऱ्या टप्प्यातील चाचणी बुधवारी एका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये सूरू करण्यात आली. या लसीचं मॅन्युफॅक्चरिंग पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाद्वारे करण्यात येत आहे. हॉस्पिटलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दोन व्हॉलेंटीयर्सना भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये ही लस देण्यात आली. त्यांनी सांगितले की परीक्षण दुपारी 1 वाजता सुरु झालं होतं.

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे निर्देशक डॉ. संजय ललवाणी म्हणाले, ‘हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 32 वर्षीय डॉक्टरची कोविड-19 चाचणी आणि अँटीबॉडी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना ‘कोविशील्ड’ लस देण्यात आली.’ त्यांनी सांगितले की एका 48 वर्षीय गाइनकालॉजिस्टला देखील ही लस देण्यात आली. ते 10 वर्षांपूर्वी स्वाइन फ्लूच्या वॅक्सीनसाठी देखील व्हॉलेंटीयर होते.

डॉ. लालवाणींनी सांगितले की, एसआयआय कडून मंगळवारी ही लस मिळाल्यानंतर पाच व्हॉलेंटीयर्सनी यासाठी नाव दिलं होतं. त्या पाच जणांची कोविड-19 चाचणी करण्यात आली पण त्यापैकी तीन जणांच्या शरीरात अँटीबॉडी असल्याचे दिसून आले, त्यामुळे त्यांच्यावर हे परीक्षण करण्यात आले नाही.

अँटीबॉडी तयार होऊ शकला तर लस उपलब्ध होण्याची शक्यता

डॉ. लालवाणींनी सांगितले की, ‘ज्या दोघांना ही लस देण्यात आली त्यांना अंडर ऑब्जर्वेशन ठेवण्यात आलं आहे. त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली असून, आमची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहे, आत्तापर्यंत तरी कोणताही वाईट परिणाम झाला नाही. दोन्ही व्हॉलेंटीयर्सना एक महिन्यानंतर पुन्हा लस देण्यात येणार आहे. पुढील सात दिवसात एकूण 25 जणांना ही लस देण्यात येणार आहे.’ ते म्हणाले, दुसऱ्या टप्प्यातील परीक्षण देशात विविध भागांतील 100 व्हॉलेंटीयर्सवर करण्यात येणार आहे.

ते म्हणाले, ‘या 100 जणांवर कोणत्याही प्रकारची असुरक्षितता निर्माण झाली नाही तर पुढील टप्प्यात 1500 लोकांवर याचं परीक्षण करण्यात येईल आणि शरीरात किती प्रमाणात अँटीबॉडी तयार होतात याचं निरीक्षण करण्यात येणार आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या जेनर इंस्टिट्यूटने ब्रिटिश-स्वीडिश कंपनी इस्टाजेनेकाच्या मदतीने विकसित लस बनवण्यासाठी एक करार केला आहे.