विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांनी केली भूमिका जाहीर

सोलापूर : पोलिसनामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभेत झालेल्या पानिपतानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष आता लयास आले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा आम्हीच आता विरोधक झालो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे राष्ट्रीय नेते राहिले नसून ते केवळ आता बारामतीचे नेते उरले आहेत. भाजपने जो ट्रॅप लावला होता त्यात शरद पवार हे अडकले आहेत, असं म्हणत वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. सोलापूरमधील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आता लयास आले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा आम्हीच आता विरोधक झालो आहोत. आम्ही आता येणाऱ्या विधानसभेची तयारी करत असून विधानसभेला मुख्य राजकीय पक्ष असणार आहोत असे म्हणत विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.यावरून आंबेडकर यांनी पुन्हा एकदा वेगळी चूल मांडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

माझ्यावर सुपारी घेतल्याचा आरोप करणारेच खरे आरोपी आहेत. लोकसभेत लोकांनी वंचितला ४१ लाखांपेक्षा जास्त मतं दिली म्हणजे आम्हाला लोकांनी स्वीकारलं आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे. सत्ता मिळवण्याच्या नादात महाआघाडीने स्वत:चं विघटन केलं आहे. पुन्हा संघटन उभे करायचे असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीने वेगवेगळे लढले पाहिजे, असा सल्लाही आंबेडकरांनी दिला आहे.