वरूण सरदेसाईंचा आमदार नितेश राणेंना इशारा, म्हणाले – ‘आरोप सिध्द करून दाखवा, नाहीतर…’

मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर भाजप आमदार नीतेश राणे यांनी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. त्यावर आता वरुण सरदेसाई यांनी नीतेश राणेंना इशारा दिला आहे. आरोप सिद्ध करून दाखवा नाही, तर मी तुमच्याविरोधात क्रिमिनल अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे, असे सांगितले.

ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव संशयाने घेतले जात आहे. त्यानंतर नीतेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावर वरुण सरदेसाई यांनी म्हटले, की माझा सचिन वाझे प्रकरणाशी काहीही संबंध नाही. संपूर्ण राणे कुटुंबीय बिनबुडाचे आरोप करत आहेत. ही त्यांची सवयच आहे. राणे कुटुंबीयांच्या 6 महिन्यांपासूनच्या पत्रकार परिषदा पाहिल्या तर आपल्याला समजेल की त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. मात्र, नीतेश राणे यांनी माझ्यावर जे काही आरोप केले आहेत, ते खोटे आहेत. त्यात ते तथ्यहीन आहे. पुरावे असतील तर त्यांनी कोणत्याही तपास यंत्रणेकडे द्यावेत. नाहीतर कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

राणेंवर विविध गुन्हे दाखल

राणे कुटुंबाची पार्श्वभूमी तुम्हा सर्वांना माहिती आहे. मर्डर, किडनॅपिंग, एक्सटोर्शन यांसारखे विविध गुन्हे दाखल आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे कुटुंबावर दाखल गुन्ह्याचा पाढाच वाचून दाखवला आहे. ते रेकॉर्डवर पण आहेत, असेही ते म्हणाले.