जात पंचायतींचा कहर सुरूच ; हुंड्याची तक्रार केल्याने महिलेवर बहिष्कार

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – माहेरवरून हुंडा आणण्यास विरोध केला तसेच जातपंचायतीचा सन्मान न करता सासरच्या लोकांविरोधात पोलिसांत तक्रार केल्याने जातपंचायतीने विवाहितेसह तिच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे. सदर घटना भोकरदन तालुक्यातील राजूर येथे घडली असून वैदू समाजाच्या जात पंचायतीने हा निर्णय घेतला आहे. २२ जानेवारी रोजी पुण्यातील जेजुरी येथे वैदू समाजाच्या जातपंचायतीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जात पंचायतीच्या या निर्णयानंतर पीडित महिलेला नातेवाईकांच्या लग्नातून देखील हाकलून दिल्याचं समोर आलं आहे.

सोनाली पंढरीनाथ शिवरकर (वय २८) यांचा ६ नोव्हेंबर २००९ ला रोजी समाजातीलच ज्ञानेश्वर अन्ना राजे यांच्याशी विवाह झाला असून ते सिंदखेडराजा येथे राहातात. लग्नानंतर काही दिवसांतच सोनालीच्या सासरच्यांनी तिला हुंड्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. मोटारसायकल घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी त्यांचा छळ करण्यात आला. अखेर या सर्व जाचाला कंटाळून त्यांनी याची तक्रार माहेरच्यांकडे केली. त्यांच्या घरच्यांनी सासरच्या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही, त्यानंतर सोनाली यांनी कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली. यावरुन सासरच्या सात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

जात पंचायतीचे भीषण वास्तव

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रबोधन आणि पोलिसांचा वचक यामुळे राज्यातील भटके जोशी, स्मशान जोगी, आदिवासी गोंड, वैदू, नागपंथी डबरी गोसावी, गोपाळ, मढी यांसह १५ जात पंचायती बरखास्त करण्यात यश मिळाले. यामुळे जात पंचायतींच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी १३ एप्रिल २०१६ रोजी विधिमंडळाने सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा मंजूर केला. परंतु अजूनही समाजावर जात पंचायतीचा पगडा कायम आहे हेच भीषण वास्तव दिसून येते.