विधानसभेसाठी सदाभाऊ खोत यांच्या ‘रयत’ची ‘या’ १२ जागांसाठी मागणी !

बुलडाणा :पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूका जवळ आल्याने राज्यात आता जागा वाटपासाठी समीकरणे सुरु झाली आहेत. भाजपच्या महायुतीतील अनेक घटक पक्ष आता जागांची मागणी करत आहेत. त्यामुळे आता महायुतीमध्ये सहभागी असलेल्या ‘रयतक्रांती संघटने’ने विधानसभा निवडणूकीसाठी राज्यातील १२ जागांची मागणी केली आहे. याबाबतची माहिती राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलडाण्यात दिली. तर बुलडाणा जिल्ह्यात मेहकर व चिखली मतदार संघात ‘रयतक्रांती संघटना’ निवडणूक लढणार आहे.

या जागांसाठी मागणी

विधानसभेच्या तोंडावर आता महायुतीतील घटक पक्ष आपल्यासाठी जागांची मागणी करत आहेत. याचप्रमाणे रयतक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील आपल्या पक्षासाठी जागावाटपात १२ जागांची मागणी केली आहे.

यासाठी ‘रयतक्रांती संघटने’कडून वाळवा (सांगली), फलटण, दक्षिण कराड, मान (सातारा), नायगाव (नांदेड), मेहकर, मानखुर्द (मुंबई), चिखली (बुलडाणा) या मतदार संघातील विधानसभेच्या जागांची मागणी करण्यात आली आहे.

कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. कृषि विभागाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमात ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषि व पाणीपुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत खोत यांनी मार्गदर्शन केले. आता विधानसभा निवडणूकीत विविध पक्षांच्या जागा वाटपाचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, सर्व पक्षातील घटक पक्ष जागा वाटपासाठी आता तयारी करत आहे.