मनसे शाखेसाठी 65 वर्षीय आजी बसल्या उपोषणाला, राज ठाकरेंनी कॉल केला अन् …. (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  मनसेची शाखा (MNS) पाडल्याच्या निषेधार्थ गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या 65 वर्षीय आजीच्या आंदोलनाची दखल खुद्द मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतली आणि चक्रे वेगाने फिरली. अन् ग्रामपंचायतीने पुन्हा स्वखर्चाने शाखा बांधूून देण्याचे कबूल केले. कार्यकर्त्यांची जिद्द, उत्साह अन् नेत्यावरील निष्ठा काय असते हे येथील घटनेवरून पाहायला मिळाले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा शहापूरच्या खर्डी ग्रामपंचायतीने तोडली होती. मात्र ही शाखा तोडली म्हणून मनसेच्या तरूण कार्यकर्त्यांनाही लाजवेल असा उत्साह असलेली 65 वर्षीय आजी उपोषणाला बसली आहे. गेल्या 3 दिवसांपासून खर्डी येथे त्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल राज ठाकरेंनी घेतली. त्यानंतर तातडीने मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज त्या आजींची भेट घेतली. या भेटीनंतर जाधव आणि ग्रामपंचायतीच्या प्रशासनाचे बोलणी झाली. संबंधित ग्राम पंचायत सदस्यांनी मनसेची शाखा पुन्हा स्वखर्चाने त्याच भागात बांधून देण्याचे कबुल केले. दरम्यान मनसेची ही शाखा वाचवणाऱ्या या आजीचे कौतुक पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी फोन करून केले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची लोकप्रियता किती आहे हे सांगण्याची कोणालाही गरज नाही, सत्ता असो वा नसो राज ठाकरेंभोवती कार्यकर्त्यांचे जाळ नेहमी कायम असते. मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्याच विधानसभेत 13 आमदार निवडून आले होते. यातील अनेक आमदारांनी मनसेची साथ सोडत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. मागील 2 विधानसभा निवडणुकीतही मनसेला म्हणावे तसे यश आले नाही. पण कार्यकर्त्यांची जिद्द आणि उत्साह असाच कायम असल्याचं शहापूर येथील एका घटनेवरून पाहायला मिळालं आहे.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पक्षसंघटनाच्या वाढीसाठी प्रयत्नशील आहेत, मंगळवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पाडली, यात राज ठाकरेंनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.