ED कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी लावला BJP कार्यालयाचा बॅनर, नोटीशीवरून राजकीय घमासान सुरु

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED ने रविवारी समन्स बजावले. त्यानंतर याबाबत खा. राऊत यांनी पत्रकार परिषद घेत असताना दुसरीकडे मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ED च्या कार्यालयाबाहेर काही शिवसैनिकांनी भाजपा प्रदेश कार्यालयाचा बॅनर झळकवला आहे. या बॅनर्सचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर त्वरित पोलीस बॅनर उतरवण्यासाठी आले असता, त्यांना शिवसैनिकांनी बॅनर उतरवण्याबाबत कारवाई महापालिका करेल असे म्हणाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. मात्र, तरीदेखील पोलिसांनी हा बॅनर उतरवला आहे. त्यामुळे ईडी नोटीशीवरून राजकीय घमासान सुरु झाल्याचे दिसत आहे.

खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पत्नीला आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया देताना ईडी हा भाजपचा पोपट असल्याचा घणाघात केला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावली आहे. मात्र आता ED च्या या समन्सवरुन शिवसेना आणि भाजपा पुन्हा वादंग निर्माण झाले आहे. ED ने रविवारी यासंदर्भातील नोटीस वर्षा राऊत यांना पाठवल्यानंतर सोमवारी (दि. 28) संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर काही वेळातच मुंबईतील कार्यालयावर शिवसैनिकांनी भाजपा प्रदेश कार्यालय असा बॅनर झळकावला आहे.
दरम्यान मंगळवारी (दि. 29) संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.