सांगलीतील बंड रोखण्याची जबाबदारी पुण्यातील कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यावर

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाण इनकमिंग झाले तसे मोठ्या प्रमाणात बंडखोरी देखील झाली आहे. बंडखोरी रोखण्याचे आव्हान दोन्ही पक्षांपुढे आहे. सांगली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान युतीपुढे आहे. सांगली जिल्ह्यातील बंडखोरी रोखण्याची जबाबादारी महसूलमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वत:कडे घेतली आहे.

सांगली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघापैकी इस्लामपूर येथे नगराध्यक्ष निशिकांत पाटील तर जतमध्ये डॉ. रवींद्र आरळी यांची समजूत काढण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. तर सांगली जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांच्या बंडखोरीबाबत मात्र पक्षाने फारसे गांभीर्य घेतले नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून कोण-कोण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतो हे पहावे लागेल.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली आहे. या ठिकाणी हुतात्मा समुहातील गौरव नायकवडी उमेदवार आहेत. भाजपकडून लढण्याची तयारी केलेल्या निशिकांत पाटील यांनी बंडाचे निशाण फडकवत या ठिकाणाहून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केल्याने ते निवडणुकीतून माघार न घेता निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

जतमध्ये आमदार विलासराव जगताप यांच्या विरोधात पाच प्रमुख नेते एकत्रित आले आहेत. डॉ. आरळी यांना उमेदवार म्हणून पुढे करीत बंडखोरी केली आहे. ते स्थानिक विकास आघाडीचे उमेदवार म्हणून समोर आलेत. इस्लामपूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात एकास एक लढत उभी करण्याचा मनसुभा ढासळताना दिसत आहे. त्यामुळे निशिकांत पाटील यांना थांबवून शिवसेनेसोबत युतीधर्म पाळण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान आहे.

Visit : Policenama.com