कर्णधार विराट कोहलीने रचला नवा विक्रम

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली याने केलेल्या शतकाच्या (११६) जोरावर भारताने ऑस्ट्रेलियापुढे २५१ धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात दमदार खेळी करत विराटने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगचे रेकॉर्डही मोडले आहेत . विराट हा आता सर्वात जलदगतीने ९ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा कर्णधार ठरला आहे.

विराट हा ६ वा कर्णधार आहे ज्याने ९ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. यामध्ये पॉन्टिंग सोबत ग्रॅमी स्मिथ (२२० डाव), महेंद्रसिंह धोनी (२५३ डाव), ॲलन बॉर्डर (२५७ डाव), स्टिफन फ्लेमिंग (२७२ डाव) या कर्णधारांचा समावेश आहे. विराटने नागपूरमध्ये सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात २२ वी धाव काढली आणि रिकी पॉन्टिंगचा हा विक्रम मोडला.

कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतरही विराटची फलंदाजी ही नेहमी बहरलेलीच राहिली आहे. कर्णधार या नात्याने ३ डावांत ३ शतकं झळकावण्याचा अनोखा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत असताना विराटने सलग ३ डावांमध्ये ११५, १४१,१४७ अशी शतकी खेळी साकारली होती.वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा आहे.विराटने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत ३९ शतके आणि ५० अर्धशतके ठोकली आहेत. त्याने २४४ सामन्यात ५९.७५ च्या सरासरीने १० हजार ६३५ धावा केल्या आहेत.