‘मेरा गुजरात जल रहा है…’ मोदींच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : वृत्तसंस्था – सध्या राजकारणासह बॉलिवुडमध्येही राजकारणाला उधाण आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. नरेंद्र मोदींनी देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले. चहा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीपासून देशाचा पंतप्रधान त्या दरम्यान घडलेल्या घडामोडी या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. याची झलक पाहता देशाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीचे हे विविध पैलू दाखवण्यात आले आहेत. ते प्रेक्षकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहेत.

बालपणापासून ते सद्यस्थितीपर्यंत नरेंद्र मोदी कशा प्रकारे त्यांच्या जीनवमुल्यावर आयुष्य जगले आणि त्यातून इतरांना प्रेरित करत राहिले याची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. तसंच, इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या काळात देशात घडलेल्या घडामोडींची दखल चित्रपटात घेण्यात आली आहे. त्यावर आधारित काही दृश्यही चित्रपटात आहेत. ‘मेरा गुजरात जल रहा है…’, असं म्हणताना नरेंद्र मोदी यांची गुजरातप्रती असणारी आपुलकी आणि त्यांचं भावुक रुप प्रेक्षकांना दिसणार आहे.

गुजरातमधील परिस्थितीमुळे चिंतातूर मोदी दिसत आहेत. दरम्यान, पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यावर पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवरील मोदींचे उग्र रुप पाहायला मिळत आहे. पाकिस्तानला खडसावताना मोदी दिसत आहेत.  त्यावरुन पंतप्रधान पदावर असताना मोदींनी सर्जिकल स्ट्राईक सारख्या केलेल्या कारवाया आठवतात. तसंच अडीच मिनीटांच्या ट्रेलरमधून नरेंद्र मोदी यांचा आतापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता, यावर सुरेख प्रकाशझोत टाकली आहे. दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट ५ एप्रिला प्रदर्शित होणार आहे.

[youtube https://www.youtube.com/watch?v=X6sjQG6lp8s]