‘वोटर हेल्पलाईन’ या मोबाईल अ‍ॅपवर मिळणार मतमोजणीची थेट माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू होण्यास आता काही तास उरलेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात मतमोजणीबद्दलची आणि विविध पक्षांच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मतांबाबतची उत्कंठा वाढत चालली आहे. मात्र, मतमोजणी कक्षात उपस्थित न राहतासुद्धा उमेदवारांना प्रत्येक फेरीत मिळणाऱ्या मतांची माहिती ‘वोटर हेल्पलाइन’ या मोबाइल अ‍ॅपवर समजू शकणार आहे. त्यामुळे केवळ विविध वृत्तवाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या मतमोजणीच्या आकडेवारीवरच अवलंबून राहावे लागणार नाही.

पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर व मावळ या चारही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी येत्या २३ मे रोजी होणार आहे. कोणत्या उमेदवाराला कोणत्या फेरीत किती मते मिळाली याबाबतची माहिती मतदान कक्षातील व्यक्तींना तत्काळ समजणार असली, तरी त्याच वेळी निवडणूक आयोगाला सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतमोजणीची आकडेवारी ऑनलाइन पद्धतीने कळविली जाणार आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्याने ऑनलाइन भरलेली माहिती या अ‍ॅपवरही दिसणार आहे.

‘वोटर हेल्पलाइन’ हे निवडणूक आयोगाचे अधिकृत मोबाइल अ‍ॅप आहे. सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा आपल्या मोबाइलवर मतमोजणीची आकडेवारी समजू शकेल, असे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या फेऱ्याची आकडेवारी केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे ‘वोटर हेल्पलाइन’ या मोबाइल अ‍ॅपवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे आपल्या मोबाइलमध्ये ‘वोटर हेल्पलाइन’ हे मोबाइल अ‍ॅप डाऊन लोड करून घेणाऱ्यांना मतमोजणीच्या फेऱ्यामध्ये मोजल्या जाणाऱ्या मतांची आकडेवारी समजू शकणार आहे.