वाघोलीचा पुणे मनपात समावेश करा नाही तर पूर्व भागांसाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करावी : आमदार अशोक पवार

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरालगत असलेल्या पुर्व भागातील गावांचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. त्यामुळे या गावांसाठी नवीन महानगरपालिका स्थापन व्हावी अशी मागणी गेली काही दिवसापासून होत आहे. त्यातच शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ,पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पञा द्वारे मागणी केली आहे.

की वाघोली गावाचे झपाट्याने नागरीकरण होत असून गावची लोकसंख्या सुमारे दोन लाखाच्या आसपास आहे येथील नागरिकांना पिण्याचे पाणी, घनकचरा, सांडपाणी, जल निवारण,वीज यासारख्या अनेक समस्या भेडसावत आहे त्यामुळे वाघोली गावाचा पुणे महानगर पालिकेत समावेश करावा किंवा या भागासाठी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्याबाबत विचार हवा अशी मागणी केली आहे.

अशोक पवार यांनी 2020 मध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी वाघोली गावाच्या समस्येविषयी लक्षवेधी सूचना विधिमंडळात मांडली होती त्याला उत्तर देताना वाघोली हे गाव पुणे महानगरपालिका समाविष्ट करणेबाबत अथवा वाघोली, मांजरी खुर्द,मांजरी बुद्रुक सह पुर्व भागासाठी दुसरी महानगरपालिका करण्यात यावी काय याबाबत विचार सुरूअसून सरकार प्रयत्नशील आहे अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे आपण या मांडलेल्या भूमिकेबद्दल अग्रक्रमाने निर्णय घ्यावा अशी विनंती आमदार अशोक पवार यांनी केली आहे.