वाट बघू पण शिवसेनेसमोर  झुकणार नाही : अमित शाह 

दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात युती करायची असल्यास आम्ही झुकणार नाही. युतीसाठी आम्ही काहीही गमावण्याच्या, कशावरही पाणी सोडण्याच्या मनस्थितीत नाही, असं शहा म्हणाले. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील भाजपा खासदारांची बैठक महाराष्ट्र सदनात पार पडली. त्यानंतर काहीही गमावून महाराष्ट्रात युती होणार नाही असे अमित शाह यांनी म्हटलं आहे.
युतीसंदर्भात शिवसेनेच्या प्रतिसादाची आम्ही वाट बघू, मात्र झुकणार नाही असं अमित शाह यांनी ठणकावलं आहे. तसंच महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवण्याचीही भाजपाची तयारी आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. शिवसेनेसाठी शेवटपर्यंत वाट पाहू मात्र कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही असंही शाह यांनी स्पष्ट केलं. या बैठकीत शाह यांनी खासदारांना निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीत नारायण राणेही उपस्थित होते.
युतीचे काय होणार हा प्रश्न अद्यापही कायम आहे. लोकसभा निवडणुकांसाठी आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी युती होणार की नाही?  हा पेच कायम आहे. पंढरपूरला झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी युतीचा निर्णय जनताच घेईल असे म्हटले आहे. तर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आमच्यासोबत येईल कारण आम्ही आणि ते समविचारी पक्ष आहोत असे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या विविध मुलाखतींमध्ये म्हटले आहे. अशात आता दिल्लीत झालेल्या बैठकीत अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सर्व जागा लढवण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच शिवसेनेच्या प्रतिसादाची वाट बघू असेही म्हटले आहे. त्यामुळे युती होणार की नाही यावर अजूनही शिक्का मोर्तब झाला नाही.