वाकड – हिंजवडी उड्डाणपुलासाठी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

आमदार लक्ष्मण जगताप व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी 50 टक्के खर्च देण्याची मागणी

पिंपरी। पोलिसनामा ऑनलाइन

हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरी करणा-या आयटीयन्सची वाहतूक कोंडीपासून कायमची सुटका करण्यासाठी वाकड कस्पटे वस्ती ते हिंजवडी असा उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर व इलिव्हेटेड मार्ग उभारण्यात येणार आहे. या कामासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी भेट घेतली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे तीनशे कोटी खर्च असल्याने 50 टक्के खर्चाचा भार केंद्र सरकारने उचलावा, अशी मागणी त्यांनी गडकरी यांच्याकडे केली.

वाकड येथील कस्पटेवस्ती ते हिंजवडी हद्दीपर्यंत अडीच किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रयत्नातून महानगरपालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, शनिवारी नितीन गडकरी पुण्यात आलेले असताना आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, संघटन सरचिटणीस प्रमोद निसळ, नगरसेवक शत्रुघ्न काटे, महापलिकेचे सहशहर अभियंता राजन पाटील यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी या उड्डाणपुल व इलिव्हेटेड मार्गाबाबत संपूर्ण माहिती दिली.

या पुलाचे संकल्प चित्रही तयार केले आहे. परंतु, या पुलासाठी सुमारे. 300 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. भविष्यात हा खर्च वाढण्याचीही शक्‍यता आहे. एवढा मोठा खर्च करण्याची महानगरपालिकेची क्षमता नाही. शहरातील अन्य प्रकल्प आणि विकासकामांनाही प्राधान्य द्यावे लागणार असल्यामुळे कस्पटेवस्ती ते हिंजवडी हद्दीपर्यंतच्या शहरातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करण्यात यावा. त्यासाठी केंद्र सरकारने नँशनल हायवेमार्फत 50 टक्के रक्कम अदा द्यावी. तसेच, उर्वरित 25 टक्के  राज्य शासनाने एमआयडीसीमार्फत आणि 25 टक्के रक्कम महानगरपालिका तिजोरीतून खर्च केली जाईल, असे आमदार जगताप यांनी सांगितले. तसेच, हिंजवडी येथील आय टी पार्कला जाणार रस्ता आहे त्यामुळे येथील वाकड, हिंजवडी परिसरातील वाहतुकीची समस्या सुटणार आहे.