शेतकर्‍यांसाठी फायद्याची गोष्ट ! ‘या’ स्कीमचा फायदा घेण्यासाठी 31 जुलैपर्यंत करा इथं रजिस्ट्रेशन, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पावसाळा सुरू झाला आहे. यासह खरीप पिकांच्या पेरणीस सुरुवात झाली आहे. ट्विटरच्या माध्यमातून सरकारने खरीप पिकांच्या विम्यासाठी अधिसूचना जारी केल्याची माहिती दिली आहे. कृषी विभागाने आपल्या संदेशात म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा नक्की करावा. बहुतेक राज्यात खरीप-२०२० चा विमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ३१ जुलै २०२० पूर्वी बँक शाखेशी संपर्क साधा.

यासाठी सुरु झाली होती पीक विमा योजना
पीक विमा ऐच्छिक आहे. नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) १३ जानेवारी २०१६ रोजी सुरू केली होती. भारतीय कृषी विमा कंपनी (एआयसी) ही योजना चालवते.

विम्यासाठी आवश्यक आहेत ही कागदपत्रे
आपण शेतकरी असल्यास आणि आपल्या पिकाचा विमा काढू इच्छित असल्यास त्यासाठी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे आवश्यक आहेत. यात शेतकऱ्यांचे ओळखपत्र म्हणजे पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड इत्यादी वापरता येईल.

इतका प्रीमियम द्यावा लागतो
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत शेतकर्‍यांना खरीप पिकासाठी २ टक्के आणि रब्बी पिकासाठी १.५ टक्के प्रीमियम भरावा लागतो. विमा योजनेत व्यावसायिक आणि बागायती पिकांसाठी देखील विमा संरक्षण दिले जाते. यात मात्र शेतकऱ्यांना ५ टक्के प्रीमियम भरावा लागतो.

किसान क्रेडिट कार्ड असलेले स्वतःच विम्याच्या कक्षेत येतात
किसान क्रेडिट कार्डद्वारे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे पीक स्वतःहून विम्याच्या कक्षेत येते. इतर शेतकरी त्यांच्यानुसार पीक विमा काढू शकतात. जनसेवा केंद्रांवर देखील पीक विमा करता येतो.