धरणातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवावी – निवृत्त कर्नल सुरेश पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरीकरण वाढत आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे. त्यासाठी धरणातील गाळ करून साठवण क्षमता वाढविणे काळाची गरज आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणापैकी खडकवासला धरणातील गाळ काढण्याचे काम मागिल अनेक वर्षांपासून ग्रीन थम्बच्या माध्यमातून सुरू केले आहे. अशाच पद्धतीने इतरही धरणातील गाळ काढला तर पिण्याचे पाणी कमी पडणार नाही, असा विश्वास निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी व्यक्त केला.

दरवर्षी २२ मार्च रोजी जागतिक जलदिनाचे औचित्य साधून ग्रीन थम्बच्या वतीने भैरोबा नाल्यावरील सोपानबाग येथे जलदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी निवृत्त कर्नल अजित देशपांडे, निवृत्त कर्नल लक्ष्मण साठे आदी उपस्थित होते.

कर्नल पाटील म्हणाले की, सोपानबाग येथे मोठा ओढा होता, मात्र दिवसेंदिवस ओढ्याचे पात्र अरुंद झाले आहे. ओढ्यातून शहरातील सांडपाणी वाहत असून, त्या पाण्याचा पुनर्वापर करून येथे देवराई फुलविली आहे. अशाच पद्धतीने पाण्याचा पुनर्वापर करणे ही काळाची गरज आहे. १९९३ सालापासून दरवर्षी २२ मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो आणि गोड्या पाण्याचे महत्त्व यावर लक्ष केंद्रित केले जाते. जागतिक जल दिन पाण्याचा उत्सव करतो आणि २.२ अब्ज लोकांना सुरक्षित पाण्याचा वापर आणि काळजी करण्याविषयी जागरूकता देतो. भविष्यात जागतिक जलसंकट सोडविण्यासाठी कारवाई करण्याबाबतदेखील हा दिवस जनजागृती म्हणून साजरा केला जात आहे, असे निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी सांगितले.