Pune News : पुण्याच्या सध्याच्या पाणीकोटयात कपात न करता सद्यःस्थितीतील पाणीवापर कायम ठेवा, अजित पवारांची सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहर आणि जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावर झालेल्या बैठकिमध्ये उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याचा सध्याच्या पाणी कोट्यात कपात न करता सद्य:स्थितीतील पाणीवापर कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे महापालिका आणि ग्रामीण भागाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन केले. तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जलसंपदा विभाग, शहर व ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी संयुक्तरित्या पाणीचोरी करणाऱ्यावर कारवाई करावी, असे आदेश अजित पवार यांनी दिले.

बैठकीनंतर अजित पवार म्हणाले, पालकमंत्री म्हणून शहर व ग्रामीण भागाला समान पाणी पुरवठा केला जाईल. पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. कालव्याजवळ बेकायदा वाहिन्या टाकून पाणी चोरीचे प्रकार घडतात. ही पाणीचोरी रोखण्यासाठी जलसंपदा विभाग, विभागीय आयुक्त आणि पोलीस यंत्रणांनी संयुक्तपणे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

तर शहराला एक दिवसाआड पुरवठा

महापालिकेमध्ये 34 गवांचा नव्याने समावेश करण्यात आल्याने शहराची लोकसंख्या 63 लाखांवर गेली असल्याची आकडेवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यावेळी दिली. त्यामुळे प्रतिवर्षी 18.58 टीएमसी पाण्याची मागणी त्यांनी केली. मात्र पुण्याकडून 90 लाख लोकांसाठी आवश्यक असलेले पाणी वापरण्यात येत आहे. आगामी काळात अशाप्रकारे पाणी वापरल्यास पुण्याला दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

ग्रामपंचायतींना पालिकेकडून पाणीपुरवठा

जलसंपदा विभागाने महापालिकेकडून मंजूर कोट्यापेक्षा अधिकचे पाणी वापरण्यात येत असल्याचे सांगितले. तर लोकसंख्या वाढल्याने पालिकेकडून काही ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे वर्षाला 18.58 अब्ज टीएमसी पाण्याची गरज असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.