Pune : ग्लायडिंग सेंटरमधील कचऱ्यात टाकले कलिंगड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना… कोरोना… कोरोना… म्हटले, तरी सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकत आहे. या भयानक परिस्धितीमध्ये शेतकऱ्यांनी शेतमाल उत्पादित केला आणि बाजारात आणला, तो व्यापाऱ्यांनी घेतला. मात्र, पोलीस आणि पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या त्रासाला शेतकरी-विक्रेतेही कंटाळले आहेत. सासवड रस्त्यालगतच्या ग्लायडिंग सेंटरमधील कचऱ्यात विक्रेत्यांनी कलिंगड चक्क टाकल्याचे पाहून अनेकांचे हृदय पिळवटून गेले. हा प्रकार कशामुळे घडला याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कलिंगड कोणी टाकले याविषयी कोणीही माहिती देण्यास तयार नाही.

शेतकरीवर्ग रात्रंदिवस शेतात राबून शेतमाल पिकवतो. मात्र, त्याला बाजार मिळत नाही. जेव्हा कधी तरी भाव मिळतो, तर खाणारे बोंब मारतात. शासनाकडून योग्य नियोजन केले जात नाही, त्यामुळे व्यापारी लूटतात, त्याकडे कोणाचे लक्ष जात नाही. नोकरीधंदा नाही म्हणून अनेकांनी भाजीपाला, फळविक्री व्यवसाय सुरू केला. मात्र, त्यांना महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या आडमुठे धोरणाचा त्रास सहन करावा लागत आहे. वीजबिल थकले म्हणून महावितरण कंपनीने वीजजोड बंद करण्याचा सपाटा लावला आहे. आता जगायचे तरी कसे असा प्रश्न शेतकरी-कामगारांनी उपस्थित केला आहे.

मागिल वर्षभरापासून लॉकडाऊन, अनलॉक, अंशतः लॉकडाऊन, कडक निर्बंध यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे रोजगार नाही, खायला नाही, उपचार मिळेनात, मिळाले तर प्रचंड पैसा द्यावा लागत आहे, अशा भयानक स्थितीमध्ये सामान्य जनता भरडली आहे. त्यातच अनेकांनी भाजी-फळविक्री व्यवसाय निवडला. मात्र, त्यातही अनेक विघ्न त्यांच्या पिच्छा करीत आहे. ग्रामीण भागात जाऊन, तर काहींनी मार्केटमधून फळे आणून रस्त्यावर, गल्लोगल्ली, गर्दीच्या ठिकाणी व्यवसाय सुरू केला.

दोन पैसे मिळू लागले, पोटापाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटला असे म्हणत सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, ही बाब एवढ्यावर थांबत नाही, रस्त्यावर थांबला की, पालिका अतिक्रमण आणि पोलीसांचा ससेमिरा सुटत नाही. त्यांना हप्ता नाही, दिला तर मालाची नासधूस करतात, पोलीस आणि पालिका अधिकारी-कर्मचारी आले की घाईगडबडीत माल घेऊन पळावे लागते. त्यामध्ये मालाचे नुकसान होत आहे. कडक उन्हात दिवसभर थांबायचे. त्यात खरेदीदाराने गर्दी केली, की पोलीस येऊन दंडुके मारतात. त्यामुळे ग्राहकही थांबत नाही, अशी भयावह अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनानेच आम्हाला कसे जगायचे याविषयी नियमावली जाहीर करून द्यावी, अशी आर्जवी मागणी सामान्यजण करीत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध केल्यामुळे अनेकांना १०-१५ दिवस काम मिळत आहे. जेवढे काम तेवढेच दाम अशी स्थिती आहे. त्यात पीएमपी बससेवा बंद असल्यामुळे रिक्षाचालक अडवून पैसे घेऊन लूट करीत आहेत. रिक्षामध्ये तीन-चार प्रवासी असले की, वाहतूक पोलीस अडवून दंडुके मारतात, अडवून ठेवतात, त्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. त्यामुळे दिवसभर काम करूनही अर्धा दिवस ग्राह्य धरला जातो, अशी चारही बाजूने कामगारवर्गाची कोंडी झाली आहे.