उत्तर कोरियाची WHO ला माहिती, म्हणाले – ‘आमचा देश कोरोनामुक्त झाला’

प्योंगयांग : वृत्तसंस्था –   जगभरात कोरोनाने थैमान घातले असतानाच काही मोजक्या देशांना कोरोना रोखण्यात यश आले आहे. अशातच कोरोनाबाधित चीन आणि दक्षिण कोरियाची सीमा लागून असलेला उत्तर कोरिया हा कोरोनामुक्त झाला आहे. देशात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याची माहिती उत्तर कोरियाने WHO ला दिली आहे. दरम्यान उत्तर कोरियाच्या या दाव्यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. येथील आरोग्य व्यवस्था चांगली नाही. देशातील परिस्थितीही चिंताजनक आहे. त्यातच कोरोनामुळे चीनसोबतच्या व्यापारावर बंधने आले आहेत. त्यामुळे येथील परिस्थिती हलाखीची असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यानंतर उत्तर कोरियाने खबरदारीच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात केली. कोरोनापासून बचाव करताना उत्तर कोरियाने आपल्या सीमा बंद केल्या आहेत. कोरोनाची लक्षणे आढळलेल्या नागरिकांचे विलगीकरण केले. या सर्व उपायांनी देश करोनामुक्त झाला असून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याचे उत्तर कोरीयाने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेतील उत्तर कोरियाचे प्रतिनिधी एडविल सल्वाडोर म्हणाले की, उत्तर कोरियामध्ये एक एप्रिलपर्यंत 23 हजार 121 जणांची चाचणी केली आहे. यात एकही बाधित आढळले नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विलगीकरणात असलेल्या लोकांबद्दल उत्तर कोरियाकडून कोणतीही माहिती दिली जात नाही. दरम्यान टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत उत्तर कोरिया सहभागी होणार नाही. खेळाडूंच्या सुरक्षितेच्या कारणास्तव सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे.