हम मौके की तलाश में हैं, मोदींचा पाकिस्तानला गर्भित इशारा !

भिलवाडा (राजस्थान) : वृत्तसंस्था-मुंबईवरच्या हल्ल्याला 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही पाकिस्तानने या प्रकरणात योग्य चौकशी केलेली नाही आणि ज्यांनी कट रचला त्यांना अटकही केली नाही. कुख्यात दहशतवादी हाफिज सईद हा या कटाचा मुख्य मास्टमाईंड असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र तो अजुनही पाकिस्तानात मोकाट आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला गर्भित इशारा दिलाय. या हल्ल्यात जे शहीद झालेत त्यांना आम्ही विसरणार नाही आणि गुन्हेगारांना शासन केल्याशीवाय राहणार नाही असं म्हणत त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला की ‘हम मौके की तलाश में हैं’ संधी येताच गुन्हेगारांना शासन करू अशी ग्वाही त्यांनी देशवासीयांना दिली.

जाहीर सभा घेऊन भारताविरूद्ध त्याचं गरळ ओकणं सुरूच आहे. याबाबत भारताने अनेकदा पाकिस्तानला विनंती केली होती. मात्र पाकिस्तानने चौकशीचं फक्त नाटक केलं असा आरोप भारतानं केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी दिलेला इशारा महत्वाचा मानला जातोय.

यावेळी बोलतांना त्यांनी काँग्रेसवरही बोचरी टीका केली. मुंबई हल्ला झाल्यानंतर या घटनेचं राजकारण करू नये असं राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते आम्हाला उपदेश देत होते. पण भारतीय लष्कराने जेव्हा सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांना ठार केलं तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचे पुरावे मागितले होते. कारवाईचा व्हिडीओ कुठे आहे असा प्रश्न त्यांनी विचारला होता. कारवाई करायला जाताना जवान खांद्यावर बंदुक घेतील की कॅमेरा असा सवालही त्यांनी केला.