सचिन वाझे प्रकरणाचा सरकारवर परिणाम होईल ? शरद पवार म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केरळमधील काँग्रेसचे नेते पीसी चाको यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील सचिन वाझे प्रकरणावर शरद पवार यांना विचारण्यात आले. त्यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, सचिन वाझे प्रकरणाचा परिणाम सरकारवर होईल, यावर आमचा विश्वास नाही, असे वक्तव्य त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते.

महाविकास आघाडीत कोणतीही अडचण नाही

सचिन वाझे प्रकरणावरुन शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याची चर्चा होती. तसेच महाविकास आघाडीमध्ये मतमतांतर असल्याचे बोलले जात होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये कोणतीही अडचण नाही. काही अडचणी येतात, मात्र त्यावर एकत्र मिळून तोडगा काढण्यात येतो, असे शरद पवार यांनी सांगितले.

सरकारवर परिणाम नाही

सचिन वाझे प्रकरणावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, एका पोलीस अधिकाऱ्याच्या तपासाचा परिणाम सरकारवर होईल यावर आमचा विश्वास नाही. या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. अशावेळी आमचे काम आहे की एनआयएला मदत करणे. ज्या लोकांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे, त्या लोकांना त्यांची जागा दाखवणं यासाठी एनआयए तपास करणार यामध्ये काहीही चुकीचे नाही, असे शरद पवार म्हणाले.

आयुक्तांच्या बदलीबाबत मुख्यमंत्र्यांना विचारा

सचिन वाझे प्रकरणामध्ये पोलिसांकडून अनेक चुका झाल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले. यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी होणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. यासंदर्भात शरद पवार यांना विचारले असता, त्यांनी परमबीर सिंह यांची बदली होणार आहे की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारा. कोणाच्या नियुक्ती आणि बदलीबाबत आम्हाला रस नाही.

सर्वकाही माध्यमांना सांगण्यासारखं नसतं

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, आम्ही कायमच भेटतो आणि बोलतो. वेगवेगळ्या मुद्यांवर आमच्यात चर्चा होते. पण सर्व काही माध्यमांसमोर सांगण्यासारखं नसतं. सरकारसमोर काही समस्या येतात. पण मुख्यमंत्री ठाकरेंशी चर्चा करुन त्या सोडवल्या जातात असे शरद पवार यांनी सांगितले.