हॉलिवूडपट ‘अ‍ॅक्वामॅन’ फेम अभिनेता जेसन मोमोआनं सांगितला ‘संघर्ष’ ! म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन टीम-  हॉलिवूड सिनेमा अ‍ॅक्वामॅन (Aquaman) फेम अभिनेता जेसन मोमोआ (Jason Momoa) हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. सर्वांत जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत त्याला गणलं जातं. परंतु यासाठी त्यानंही खूप स्ट्रगल केला आहे. एक वेळ अशी होती जेव्हा त्याला 2 वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागत होता. केवळ ब्रेड आणि मीठ खाऊन दिवस काढलेल्या जेसननं चकित करणारा त्याचा अनुभव सांगितला आहे.

एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला की, गेम ऑफ थ्रोन्स या मालिकेत मी खाल ड्रायगोची भूमिका साकारली होती. या सुपरहिट मालिकेमुळं मी सुपरस्टार होईल अशी मला अपेक्षा होती. परंतु माझी अपेक्षा फोल ठरली. मी कामाच्या शोधात होतो परंतु मला हवं तसं काम मिळत नव्हतं. चांगले प्रोजेक्ट नसल्यानं माझी आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती. पत्नी आणि मुलांना सांभाळणं मला अवघड जात होतं.

पुढं बोलताना त्यानं सांगितलं की, पत्नी कंपनीत काम करत असल्यानं महिन्याचा खर्च कसाबसा निघत होता. अशाही काही रात्री घालवल्या आहेत जेव्हा आम्ही फक्त ब्रेड आणि मीठ खाल्लं आहे. पण माझा धीर खचला नाही. मी प्रयत्न सुरू ठेवले. ऑडिशन दिलं. आणि आज माझ्याकडे बिग बजेट प्रोजेक्ट आहेत.

जेसनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 1999 साली आलेल्या बेवॉच या मालिकेतून त्यानं करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर नॉर्थ शोर, द गेम, द रोड रोड, यांसारख्या काही मालिकांमध्ये त्यानं काम केलं. मालिका करतानाच तो सिनेमातही कार्यरत होता. जॉन्सन फॅमिली व्हॅकेशन, बुलेट टू द हेड, पाईपलाईन, कॅनन द बार्बोरियन अशा काही सिनेमात त्यानं काम केलं. त्याला काम तर मिळत होतं. परंतु चांगल्या भूमिका मिळत नव्हत्या. वॉर्नर ब्रोसच्या अॅक्वामॅन सिनेमामुळं त्याचं नशीबच बदललं. आज तो एक सक्सेसफुल अॅक्टर म्हणून ओळखला जातो.