उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती आढळली ! टाऊन प्लॅनिंगमधील बडया अधिकार्‍यासह पत्नी आणि मुलांवर पुण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती आढळून आल्याने अमरावती येथील नगर रचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर आणि त्यांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांच्या पुण्यातील घरांची ऐसीबीकडून झडती सुरू आहे. ते पूर्वी पुण्यात होते. त्यावेळी देखील त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी होत्या.

हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय ५३) यांच्यासह पत्नी संगिता (वय ४५), मुलगी गीतांजली (वय २३), मुलगा भास्कर (वय २३, सर्व रा. स्वप्नशिल्प हौसिंग सोसायटी कोथरूड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाझीरकर कुटूंबियासह कोथरुडमध्ये राहायला आहेत. हनुमंत सध्या अमरावती येथे नगररचना विभागात सहसंचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याची तक्रार काही महिन्यांपुर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली होती. त्यानुसार मागील सहा ते सात महिन्यांपासून नाझीरकर यांच्याकडील मालमत्तेची चौकशी सुरु होती. त्यानुसार उत्पन्नापैकी त्यांच्याकडे २ कोटी ८३ लाख ६६ हजार रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली. यासंदर्भात ते स्पष्टीकरण देऊ शकले नाही. त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात ही मालमत्ता त्यांनी पदाचा गैरवापर करुन भष्ट्राचारातून कमाविली असल्याचे निष्पन्न झाले. सध्या त्यांच्या कोथरूड भागातील घराची झडती घेण्यात येत आहे.

पुण्यात असतानाही अनेक तक्रारी

नाझीरकर हे पूर्वी पुण्यात नगर रचना कार्यालयात सहसंचालक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर त्यांची बदली अमरावती येथे करण्यात आली.