आम्ही कायदा नाही, फक्त आणि फक्त कुराण मानतो ; आजम खान यांचे वादग्रस्त विधान

रामपूर : वृत्तसंस्था – संसदेत तीन तलाक विधेयकावर चर्चा झाल्यानंतर काँग्रेसने सभात्याग केला. काँग्रेसच्या सभात्यागानंतर २५६ खासदारांनी मतदान केलं. २५६  विरुद्ध ११अशा मतांनी विधेयक मंजूर करण्यात आले. तीन तलाक विधेयकाला लोकसभेत मंजूरी मिळाली असल्याने आता हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येईल. त्यानंतरच त्याचं कायद्यात रुपांतर होणार आहे. मात्र समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांच्या विधानाने  खळबळ माजण्याची शक्यता आहे.
समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांनी मुस्लिमांना कोणताही कायदा मान्य नसून आम्ही फक्त  कुराणला मानतो असे वक्तव्य केले आहे. जे आम्हाला लहानपणा पासून कुराण शिकवतं तेच मुस्लिम आमलात आणणार, कुराणमध्ये जे लिहिलंय,तेच मुस्लिम जनता मानेल. आम्हा मुस्लिमांसाठी पर्सनल लॉ बोर्ड आहे. आम्ही कसं लग्न करावं, कसे  तलाक द्यायचे  हा आमच्या वैयक्तिवक विषयाबरोबर धार्मिक विषय आहे’ असं खान यांनी म्हटलं.
केंद्र सरकारने सोमवारी लोकसभेत तिहेरी तलाक बेकायदा ठरवणारे नवे विधेयक सादर केले. हे विधेयक कोणत्याही समाज किंवा धर्माविरोधात नाही,हे  विधेयक महिलांचे अधिकार आणि न्यायहक्कासाठी आहे. असे मत आज  कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत मांडले. असदुद्दीन ओवेसी यांनी हे विधेयक आमच्या  संस्कृती धर्माचे उल्लंघन करणारे असल्याचे म्हटले आहे.