‘एन्काऊंटर’चे देशभरातून स्वागत, न्याय दिल्याची लोकांची ‘भावना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हैदराबाद महिला डॉक्टर बलात्कार व खुन प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर करण्याच्या पोलिसांच्या कृत्याचे देशभरातून स्वागत होत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते सामान्य महिला, नागरिक यांनी या कृत्याचे स्वागत केले असून अशा गुन्हेगारांना दयामाया दाखविण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन केले आहे.

दिल्लीतील निर्भयाचा आई आशादेवी यांनीही या घटनेचे स्वागत केले आहे. त्या महिला डॉक्टराला न्याय दिल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मुलीला न्याय मिळावा, यासाठी आम्ही अजूनही प्रयत्न करत आहोत. न्यायालयाने त्यांना शिक्षा दिली असली तरी अजून त्यांना फाशी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी केले ते चांगलेच केले़ तिला न्याय दिला, असे त्यांनी सांगितले.

भूमाता संघटनेच्या तृप्ती देसाई यांनी या घटनेचे स्वागत केले आहे. अशा प्रकारच्या कृत्यामुळे मुली आणि महिलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. उन्नाव प्रकरणातील पिडित मुलीला न्यायालयात नेण्यात येत असताना तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. येथे आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. जर ते पळून गेले असते तर, त्यांनी आणखी काही जणींना लक्ष्य केले असते. त्यामुळे महिला व मुलींना आणखी असुरक्षित वाटले असते. त्यामुळे पोलिसांनी केले ते योग्य केल्याचे देसाई यांनी सांगितले. देशभरातील महिला व नागरिकांकडून या घटनेचे स्वागत केले जात असून अशा नराधमांना जगण्याचा काही अधिकार नसल्याचे सांगितले जात आहे.

Visit : Policenama.com