WB Election 2021 : संजय राऊत म्हणाले – ‘पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढतील पण…’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन  –   पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांत सुरु होत आहे. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला 27 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पण यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. ‘राज्यात भाजपच्या जागा वाढतील पण त्यांना बहुमत मिळणार नाही. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला सत्ता राखण्यात यश येईल’. असे ते म्हणाले.

नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. ते म्हणाले, ‘सध्या पश्चिम बंगालमध्ये महाभारत घडत आहे. एकट्या ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपने संपूर्ण सत्ता मैदानात उतरवली आहे. एका महिलेसाठी सरकार मैदानात आहे. ममता बॅनर्जी या सत्ता राखण्यात यशस्वी ठरतील, असे वाटते. या संघर्षात आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेसनेही असाच निर्णय घेतला आहे’.

दरम्यान, नाशिकमध्ये पुढील वर्षी महानगरपालिका निवडणूक होणार आहे. जळगाव पॅटर्न नाशिकमध्ये दिसणार नाही. या निवडणुकीत आघाडी असो किंवा नसो महापौर शिवसेनेचाच होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एनआयएने घाईत तपास हाती घ्यायचा नव्हता

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवला. मात्र, मुंबई पोलिस दल तपास करण्यास सक्षम आहेत. एनआयएने इतक्या घाईने तपास हाती घेण्याची गरज नव्हती. विरोधी पक्षाचे सरकार राज्यात असल्याने केंद्राकडून अडचण आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असेही ते म्हणाले.