…तेव्हा शेतकरी आणि तरूणांसाठी काय उपाय योजना केल्यात हे स्पष्ट होईल

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये महाआघाडीची भव्य रॅली काही दिवसांपूर्वीच पार पडली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये रॅलीचे आयोजन केले आहे. रॅलीदरम्यान, त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या जनतेचा एवढा पाठिंबा असल्याचं चित्र पाहिल्यामुळेच ममतादीदी हिंसेवर उतरल्या होत्या हे मला आता समजलं, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला आहे.

आमच्याप्रति पश्चिम बंगालच्या जनतेत असलेल्या प्रेमाला घाबरले आहेत. त्यामुळे लोकशाही वाचवण्याचे नाटक करणारे निर्दोषांचा बळी घेण्याच्या मागे आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत गावाकडच्या परिस्थितीकडे लक्ष दिलं गेलं नाही, हे देशाचं दुर्भाग्य आहे. पश्चिम बंगालमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत गावांमधील समस्या बिकट आहेत, असं मोदींनी यावेळी म्हटलं.

आमचं सरकार शेतकऱ्यांचं जीवन आनंदी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे एक सुरुवात आहे. जेव्हा नवं सरकार बनवल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प येईल, तेव्हा शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी आम्ही काय उपाय योजना केल्यात याचं चित्र स्पष्ट होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

आपल्या देशात अनेकदा शेतकऱ्यांबरोबर कर्जमाफीचं राजकारण खेळलं जातं. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत होता, ते काही वर्षांनंतर पुन्हा कर्जबाजारी होत होते. आता राज्यांमध्ये कर्जमाफीच्या नावे मत मागण्यात आली. ज्यांनी कर्ज घेतलं आहे, त्यांचं कर्ज अद्याप माफ झालेलं नाही आणि ज्याचं झालंय त्यांना फक्त 13 रुपयेच मिळाले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या या घटना आहेत, असंही त्यांनी यावेळी नमुद केलं जाते.