‘गिरीष काय रे’ ? एका त्रस्त पुणेकराच्या बॅनरबाजीने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ‘पुणेरी पाट्या’ ही पुणेकरांची खासियत. आपल्या शैलीदार आणि खोचक लिखाणातून समोरच्या माणसाला कसे बोलायचे हे पुणेकरांना बरोबर कळते. सध्या पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. त्यामुळे भरभरून पाणी वापरणाऱ्या पुणेकरांची चांगलीच पंचाईत झाली आहे. आधी पुण्याला एक दिवस आड पाणी पुरवठा केला जात होता मात्र आता दोन दिवस आड पाणी पुरवठा केला जातोय त्यामुळे पाणी कपातीमुळे त्रस्त झालेल्या एका पुणेकराने ‘गिरीष काय रे’ ? अशा मथळ्याचे एक बॅनर तयार केले आहे. हा बॅनर मात्र पुणे शहरात ठिकठिकाणी पाहायला मिळतो आहे. त्यामुळे शहरात या बॅनर ची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

काय आहे बॅनर ?
“गिरीष  काय रे ? दुष्काळ असतानासुद्धा ‘अजित’ने कधी पाणी कमी पडू दिले नाही ! तू तर आपल्या शहरातला ना ? पाणी कुठं मुरतय ? अशा स्वरूपात हे बॅनर लिहिण्यात आले आहे. या बॅनरच्या शेवटी ‘एक त्रस्त पुणेकर नागरिक ‘, असे लिहिले आहे. आता या बॅनर ने शहरात चांगलीच खळबळ माजणार यात शंका नाही.
राजकीय उद्देश ?
हे बॅनर कुणी शहरात लावले आहेत याची कुणालाच कल्पना नाही, मात्र पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांना सरळसरळ पाणीकपातीबाबत धारेवर धरण्यात आल्याचे दिसते आहे. तसेच पुण्याचे माजी पालकमंत्री अजित पवार यांच्या काळात ‘दुष्काळ असतानासुद्धा ‘अजित’ने कधी पाणी कमी पडू दिले नाही’! असे म्हंटले आहे. पुण्याचे सद्याचे पालकमंत्री आणि पुण्याचे माजी पालकमंत्री या दोघांची नावे या बॅनरमध्ये झळकल्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात हे कोणत्या राजकीय हेतूने तरी केला नसावे ना ? अशी शंका देखील व्यक्त करण्यात येत आहे.
 ‘शिवडे आय एम सॉरी…!’  ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ ? नंतर आता “गिरीष काय रे ?
यापूर्वी पुणे शहरात ‘शिवडे आय एम सॉरी…!’ अशा स्वरूपाचे होर्डिंग लावण्यात आले होते. त्याची चर्चा देखील आख्या शहरभर झाली होती. एवढेच नव्हे ‘शिवडे आय एम सॉरी…!’ चे होर्डिंग लिहीणाऱ्या त्या महाभागाला पोलिसांनी शोधून काढले होते. त्यानंतर ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ ? पिंपरी चिंचवडमध्ये अशा स्वरूपाच्या पोस्टरने खळबळ माजवली होती. पिंपरी शहरातील आकुर्डि ते चिखली या मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर हे फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यानंतर आता “गिरीष  काय रे ? च्या या बॅनर ने पुण्यात एकच खळबळ माजली आहे. यापूर्वीचे पोस्टर सामान्य व्यक्तीशी निगडीत होते मात्र आता यात राजकीय व्यक्तींची नावे असल्यामुळे याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात देखील केली जात आहे.